डोंगराळ, पडीक जमिनीत डांग्या भोपळ्याची यशस्वी शेती

0
वडगाव मावळ : डोंगराळ भागामध्ये काही उत्पादन होऊ शकत नाही. पिक घेण्यासाठी चांगली कसदार जमीन गरजेची असते. परंतु काही प्रगतिशिल शेतकर्‍यांनी पडीक जमिनीमध्ये चांगले उत्पन्न घेतल्याचे दिसून येत आहे. वडगाव मावळ परिसरातील प्रगतशिल शेतकरी दिनेश भगवान पगडे यांनी त्यांच्या डोंगराळ पडीक जमिनीत डांग्या भोपळ्याचे विक्रमी उत्पादन घेत अन्य शेतकर्‍यांपुढे आदर्श उभा केला आहे. दिनेश भगवान पगडे यांच्या डांग्या भोपळ्याच्या शेतीची परिसरात चर्चा असून, तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी तसेच अनेक प्रगतीशील शेतकर्‍यांनी भेट देत विकसित शेतीचे कौतुक केले आहे. ज्या डोंगराळ आणि पडीक जमिनीत काहीही उगवण्याची शक्यता नव्हती, तशा जमिनीतूनही पगडे यांनी सोन्यासारखे पीक घेऊन दाखवले आहे.
जमिन विकली नाही
सह्याद्रीच्या डोंगररांगा वसलेल्या मावळ तालुक्यातील जमिनींचा दर गगनाला भिडलेला आहे. त्यामुळे सारेच शेतकरी आपली शेती विकत आहेत. शेतकरी माळरान, डोंगराळ व पडीक जमीन विकून टाकत असतात. मात्र पगडे कुटुंबीयांनी जिद्दीने व मेहनतीने स्वतःच्या डोंगराळ पडीक जमीनी विकल्या नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या डोंगराळ पडीक जमिनीवर गवताशिवाय काहीच उगवत नव्हते. त्या जमिनीत मातीचा थर नावालाच मुरूम व डबर अधिक असल्याने उन्हाळ्यात त्या डोंगराळ पडीक जमिनीत जागोजागी चार फूट लांबी, रुंदी व खोलीचे खड्डे घेत त्यात सेंद्रिय खत व माती टाकून खड्डे भरून घेतली. त्या खड्ड्यात जुलै व ऑगस्ट दरम्यान डांग्या भोपळ्याच्या बियाचे रोपण केले. केवळ सेंद्रीय खत देत त्यांची जोपासना करण्यात आली. सद्यस्थितीला सुमारे 20 ते 25 किलो वजनाचे हजारो भोपळे लागले आहेत. सद्य पितृपक्ष असल्याने डांग्या भोपळ्याला प्रती किलो 50 ते 60 रुपयांचा भाव मिळत आहे. हा भोपळा वर्षभर दैनंदिन आहारात वापरात असल्याने मागणी कायम असते. तळेगाव दाभाडे व वडगाव मावळ बाजारात तसेच काही व्यापारी किरकोळ भावात घेवून जातात. हा प्रयोग यशस्वी झाल्याने परिसरातील शेतकरी डांग्या भोपळ्याची शेती पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत. या छोट्याच्या भोपळ्याच्या शेतीतून लाखभर रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. आणखी वेलांना फळ लागत आहेत.
परिसरात शेतीची चर्चा
दिनेश पगडे यांनी सांगितले की, डांग्या भोपळ्याच्या शेतीची परिसरात चर्चा होत आहे. कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी तसेच अनेक प्रगतीशील शेतकर्‍यांनी भेटी दिल्या आहेत. मावळ तालुक्यात मुबलक पाऊस पडतो पाण्याचे योग्य नियोजन करून असलेल्या डोंगराळ, माळरान व पडीक जमिनीत जिद्दीने, मेहनतीने, आत्मविश्‍वासाने शेतीत कष्ट केल्यावर नक्कीच यश मिळते आणि ते यश आम्ही मिळविल्याचा आनंद होत आहे.
Copy