डोंगरगाव रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम रखडले

0

शहादा: शहरातून जाणाऱ्या डोंगरगाव रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम रखडले असून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे वाहनधारकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमध्ये वाहने आदळून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन रस्त्याच्या कामात गती देण्याचे आदेश करावेत, अशी मागणी होत आहे.

रुंदीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी आदेश द्या

शहरातून जाणाऱ्या डोंगरगाव रस्त्यावरील पटेल रेसिडेन्सी चौक ते डोंगरगाव चौफुलीपर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. अनेक महिन्यापासून या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटूनही रस्त्याच्या रुंद करण्याचे काम संथगतीने सुरू आहे. रस्त्याच्या दुतर्फा गटारीचे कामही केले जात असताना ते अपूर्णावस्थेत आहे. या रस्त्यालगत अनेक रुग्णालये शाळा व रहिवास वसाहती असून हा रस्ता शहादा शहराबाहेरून जाणाऱ्या वळण रस्त्याला मिळत असल्याने या मार्गावरून वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असते. रस्त्यावर संबंधित ठेकेदाराने जागोजागी खोदून ठेवल्याने खड्डे पडले आहे. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकवेळा लहान-मोठे अपघात होत आहेत. दुचाकी चालकांचे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावरून दोन वाहने पास करताना अडचणी उद्भवत आहेत. तरीही संबंधित ठेकेदाराकडून काम संथगतीने सुरू आहे.अशातच लॉकडाऊनचा फायदा घेत या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम रखडले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे नियंत्रण असलेल्या या रस्त्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ठेकेदाराला रस्ता रुंदीकरणाच्या कामात गती देण्यासाठी आदेश करण्याची मागणी होत आहे.

Copy