डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी त्यांचे डूडल बनवा

0

मुंबई – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त विसर पडलेल्या गूगल कंपनीने ही कसर भरून काढताना येत्या १४ एप्रिलला बाबासाहेबांचे डूडल बनवावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.

जगातील अनेक महत्त्वाचे दिवस असोत किंवा प्रसिद्ध व्यक्तींचे वाढदिवस असोत, त्या दिवसांचे आकर्षक असे डूडल बनवून त्या दिवसांची वा त्या व्यक्तीच्या कामाची महती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम गूगल हे लोकप्रिय संकेतस्थळ नेहमीच करत असते. महात्मा गांधी, रबिन्द्रनाथ टागोर, सत्यजित रे, पं. रविशंकर यासारख्या अनेक जगविख्यात भारतीयांची डूडल्स गूगलने प्रकाशित केली आहेत. पण २०१६ साली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरसारख्या कर्तृत्त्ववान व्यक्तिमत्वाच्या १२५व्या जयंतीचा गूगलला विसर पडला. म्हणून यावर्षी १४ एप्रिलला बाबासाहेबांचे डूडल बनवावे असे मनसेचे नेते, माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी गूगलला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्वत्तेची व सामाजिक कार्याची दाखल साऱ्या जगाने घेतली आहे. गूगलसारख्या सगळ्यात मोठ्या सर्च इंजिनला त्यांचा विसर पडणे, हा आम्ही त्यांचा अपमानच समजतो. गेल्या वर्षी म्हणजेच बाबासाहेबांच्या १२५व्या जयंतीदिनी आम्ही त्यांना याची जाणीव करून दिली होती. यावर्षी पुन्हा एकदा आम्ही त्यांच्याकडे मागणी करीत आहोत, असे सरदेसाई यांनी सांगितले. मनसेचे विभाग अध्यक्ष सुनील हर्षे यांनी गूगलच्या मुंबई कार्यालयात जाऊन त्यांच्या व्यवस्थापकांसमोरही मनसेची भूमिका मांडली, असेही त्यांनी सांगितले.