डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे नंदुरबारात स्वच्छता अभियान

0

नंदुरबार । डॉ. श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा, ता. अलिबाग, जि.रायगड यांच्या सौजन्याने बुधवार दि.1 मार्च 2017 रोजी नंदुरबार शहर व शहादा परिसरात भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधिक्षक डॉ.राजेंद्र डहाळे, प्रांताधिकारी निमा अरोरा, न.पा.मुख्याधिकारी शांताराम गोसावी, उपनगराध्यक्ष राजेंद्र माळी आदींच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

35.5 टन वजनाचा कचरा गोळा
अभियानात सहभागी झालेल्यांनी हातात झाडू घेवून शहर व परिसरातील सरकारी आवारे व प्रमुख रस्ते यांची सुमारे 5 किलोमीटर अंतराच्या रस्त्यांची सफाई करत स्वच्छतेचा संदेश दिला. या स्वच्छता अभियानात 1.5 टन ओला व 34 टन कोरडा असा एकुण 35.5 टन वजनाचा कचरा गोळा करण्यात आला. कचरा गोळा करण्यासाठी ट्रॅक्टर व घंटा गाडीसारख्या एकुण 9 वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. गोळा करण्यात आलेल्या कचर्‍याची विल्हेवाट प्रशासनाच्या मार्गदर्शनानुसार शहराच्या डम्पिंग भागात लावण्यात आली.

कचरा डम्पिंग ग्राउंडला जमा
हातमोजे, झाडू, मास्क, कचरा उचलण्याचे साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुरविण्यात आले. जमा कचरा सरकारी अथवा खाजगी वाहनातून डम्पिंग ग्राउंडपर्यंत पोहचविण्यात आला. या अभियानात जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, पोलीस अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी इत्यादी संबंधित अधिकार्यांनी उत्साहाने सहभाग घेत सहकार्य केले. या अभियानास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी, सचिन धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रतिष्ठानच्या सदस्यांचा सक्रीय सहभाग
स्वच्छता अभियानात नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार शहरासह शहादा, तळोदा व दोंडाईचा येथील प्रतिष्ठानच्या 394 च्या वर सदस्यांनी सक्रीय सहभाग नोंदविला. स्वच्छता मोहिमेत सरकारी कार्यालयांची आवारे व शहरातील प्रमुख रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. सदर स्वच्छता मोहिम प्रतिष्ठानच्यावतीने एकाच दिवशी संपूर्ण भारतात राबविण्यात आली. ही स्वच्छता मोहिम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी नियुक्त केलेले स्वच्छतादूत डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली.