डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालय कोव्हीडसाठी अधिग्रहीत

0

जळगाव – कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांना उपचाराच्या सुविधा मिळण्यात अडचण येऊ नये म्हणून आता गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय हे कोरोना बाधित रूग्णांसाठी अधिग्रहीत करण्यात आले आहे. दरम्यान रावेर, यावल, मुक्ताईनगर, भुसावळ, बोदवड, जामनेर आणि जळगाव ग्रामीण या भागातील बाधित किंवा संशयीत व्यक्तींवर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात उपचार केले जाणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज दिले.

जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा एक हजार पार गेला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाची बेड क्षमता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने खाजगी रूग्णालये देखिल अधिग्रहीत केले आहेत. आत्तापर्यंत गणपती हॉस्पीटल, गोल्ड सिटी हॉस्पीटल, पाचोराचे विघ्नहर्ता हॉस्पीटल हे कोरोना बाधित रूग्णांच्या उपचारासाठी अधिग्रहीत करण्यात आले आहे. रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय हे पुर्णत: कोव्हीडसाठी अधिग्रहीत करण्यात आले आहे. कोव्हीड व्यतीरिक्त इतर कुठल्याही रूग्णास या रूग्णालयात दाखल करून घेता येणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच रूग्णालयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त देण्याच्या सुचना करण्यात आल्या आहे.

समन्वयाची जबाबदारी कॅफोंवर

जिल्हा प्रशासनामार्फत अधिग्रहीत करण्यात आलेल्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात रूग्णांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी समन्वयक म्हणून जिल्हा परिषदेचे कॅफो विनोद गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रूग्णालयात दाखल होणार्‍या बाधित किंवा संशयित रूग्णांना योग्य ते मार्गदर्शन व समुपदेशन करण्यासाठी स्वतंत्र मदत कक्षाची व्यवस्था करण्याचे आदेश आहेत. या कक्षात कर्मचार्‍यांचीही नियुक्ती करावयाची आहे.

दैनंदीन माहिती द्यावी लागणार

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात दाखल होणार्‍या रूग्णांची माहिती दररोज सायंकाळी ५ वा. हॉस्पीटल व्यवस्थापनाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्ष व जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडे सादर करावयाची आहे. तसेच आयसीएमआरच्या पोर्टवरही ही माहिती रूग्णालयास भरावी लागणार आहे.

Copy