डॉ. आंबेडकर आणि देशाचे संविधान या समीकरणाशी एकनिष्ठ राहणे आवश्यक

0

डॉ. श्रीपाल सबनीस : संविधान दिनानिमित्त संविधान जागर सप्ताह

पुणे : आंबेडकर आणि संविधान हे एक समीकरण आहे. या समीकरणाशी एकनिष्ठ राहणे अतिशय आवश्यक आहे. अत्यंत ‘कडवा हिरवा’ अथवा ‘कडवा भगवा’ रंग देशाला परवडणारा नाही. तर सर्वांना सन्मानाने वागविणार्‍या निळ्या रंगाचे प्रतिनिधित्व या देशाला आवश्यक आहे. त्यासाठी शहरातील सर्व आंबेडकरवादी गटांना एकत्रित करण्याचे महत्त्वाचे काम भारतीय संविधान संवर्धन समितीच्या माध्यमातून घडते आहे, ही अभिमानाची बाब आहे, असे मत माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

भारतीय संविधान संवर्धन समितीतर्फे संविधान दिनानिमित्त संविधान जागर सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाचे उद्घाटन आरपीआयचे अविनाश महातेकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अर्जुन डांगळे यांच्या हस्ते अ‍ॅड. प्रमोद आडकर व अ‍ॅड. रंजना भोसले यांना संविधान रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी नगरसेविका लता राजगुरू, नगरसेवक रवींद्र माळवदकर, सदानंद शेट्टी, विठ्ठल गायकवाड उपस्थित होते.

संविधान बदलणे अशक्य

अविनाश महातेकर म्हणाले, संविधान नष्ट होते की काय अशी भीती दर्शविली जात असताना, संविधानाचा सन्मान करण्यासाठी हा जागर कार्यक्रम कौतुकास्पद आहे. बाबासाहेबांनी हुकूमशाही कधी लादली नाही. त्यांनी दलितांसाठी, वंचितासाठी वेगळा प्रदेश मागितला नाही. संविधान बदलण्याची तरतूदच नाही. त्यामुळे संविधान बदलणे अशक्य आहे. ज्यादिवशी संविधान बदलले जाईल, त्यादिवशी देशात दंगली होतील. संविधान इतके तकलादू नाही की कोणीही त्याला बदलू शकेल. त्यामुळे आपणही हा विश्‍वास बाळगला पाहिजे.

शाहू वेगळे व फुले वेगळे असे चित्र

डॉ. सबनीस म्हणाले, सर्व जातीचे महासंघ हे संविधानविरोधी आहेत. आरक्षणाच्या संदर्भात त्याचे मूळ समजून घेतले पाहिजे. फुले-शाहू-आंबेडकर हे एक समीकरण आहे. मात्र मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर ओबीसी आणि मराठा समाज एकमेकांच्या विरोधात गेल्याने या विचारसरणीतील शाहू वेगळे आणि फुले वेगळे असे चित्र दुर्दैवाने निर्माण होत आहे.

धर्माच्या नावावर समाजात फूट

अर्जुन डांगळे म्हणाले, बाबासाहेबांनी लोकशाही ही जीवनपद्धती मांडली. तिचे सामाजिकरण व्हावे यासाठी विविध कायदे संविधानाच्या माध्यमातून त्यांनी देशाला दिले. राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही, माणसाला माणूस म्हणून वागणूक देण्याचा अधिकार याद्वारे दिला. संविधानविरोधी वातावरण असले, तरी बाबासाहेबांचे विचार, त्यांची लोकशाही ही केवळ देशातच नव्हे तर जगात स्वीकाहार्य आहे.

Copy