डॉ. आंबेडकरांचे स्मारक उभारणार 6 डिसेंबर 2020 पर्यंत!

0

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची माहिती

मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक इंदूमिलच्या जागेवर 6 डिसेंबर 2020 पर्यंत उभारले जाईल अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. बांद्रा येथील एमएमआरडीए कार्यलयात रामदास आठवले यांनी इंदूमिल स्थळी उभारण्यात येणार्‍या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या कामाचा आढावा घेणारी बैठक घेतली. यावेळी स्मारक कामाची प्रमुख जबाबदारी असलेले एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त प्रवीण दराडे, वास्तुविशारद शशी प्रभू, शिल्पकार राम सुतार, शापुरजी पालनजी कंपनीचे व्यवस्थापक उमेश साळुंखे, महापरिनिर्वाण समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, एमएमआरडीएच्या सुचेता कदम-देशपांडे, पृथ्वी भाटी, प्रवीण मोरे, हेमंत रणपिसे आदी मान्यवर उपस्थित होते.

350 फुटांचा आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा

इंदूमिलच्या जागेवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याची कालमर्यादा फेब्रुवारी 2021 सालापर्यंत निर्धारित केली असून स्मारकाचे काम वेगवान पद्धतीने होत असून 6 डिसेंबर 2020 पर्यंत काम पूर्ण होऊन त्याचे उद्घाटन करण्यात येईल अशी ग्वाही या बैठकीत सर्व संबंधित अधिकार्‍यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंना दिली. हे स्मारक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महान व्यक्तिमत्त्वाला साजेसे उभारण्यात यावे. अजरामर ठरणार्‍या या स्मारकाचे काम असून या स्मारकाच्या कामात कोणताही कामचुकारपणा न करता जबाबदारीने काम करण्याची सूचना रामदास आठवलेंनी अधिकार्‍यांना केली. या स्मारकाचे काम अभ्यासपूर्ण विचारपूर्वक करत असल्यबद्दलही आठवलेंनी समाधान व्यक्त केले आहे. इंदूमिलमधील स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा हा 350 फुटांचा उभारण्यात येणार आहे. या स्मारकात ग्रंथालय, ई-लायब्ररी तसेच विपश्यना केंद्र, सभागृह उभारण्यात येणार आहे. या स्मारकाचे प्रवेशद्वार संचिच्या स्तूपाच्या प्रवेशव्दारासारखे बौद्ध संस्कृतीचे प्रतीक म्हणून उभारण्यात यावे तसेच स्मारकात स्तूप उभारण्यात यावा, अशी सूचना आठवलेंनी यावेळी अधिकार्‍यांना केली.

743 कोटी रुपये खर्च

डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाच्या प्रत्यक्ष कामासाठी आवश्यक सर्व परवानगी मिळवण्यात आल्या आहेत. तेथील झाडे तोडण्याची महापालिकेची परवानगी मिळवण्यात आली असून जमीन सपाटीकरणाचे काम करण्यात येत आहे. समुद्राचे पाणी इंदूमिलमध्ये येऊ नये यासाठी भिंत उभारण्याचेही काम करण्यात येत आहे. या स्मारकासाठी 743 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत तसेच या स्मारकासाठी महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेत शासनाने समिती नियुक्त केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 350 फूट उंच पुतळा उभारण्यात येत असून, या पुतळ्याचा चेहरा हुबेहूब डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखा दिसत नसल्याबद्दल रामदास आठवलेंनी यावेळी नापसंती व्यक्त केली.