Private Advt

डेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा मृत्यू

जकार्ता : करोना महासाथीच्या आजारामुळे मागील काही आठवड्यांमध्ये इंडोनेशियात शेकडो अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पाच वर्षांखालील मुलांचाही समावेश आहे. इंडोनेशियात लहान मुलांचा मृत्यू दर हा जगातील अन्य देशांच्या तुलनेत अधिक आहे. या महिन्याच्या एका आठवड्यात १०० हून अधिक बालकांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. इंडोनेशियात सध्या करोनाच्या संसर्गाने जोर धरला आहे. दक्षिण-पूर्व आशियात करोनाचा डेल्टा वेरिएंट थैमान घालत आहे. अशातच इंडोनेशियात बालकांचा मृत्यू होत आहे.

बालरोग तज्ज्ञांनुसार इंडोनेशियात एकूण करोनाबाधितांच्या प्रकरणात १२.५ टक्के बाधित रुग्ण हे लहान मुले आहेत. याआधी दोन आठवड्यापूर्वीच एका आठवड्यात १५० मुलांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. यातील निम्मी संख्या ही पाच वर्षाखालील बालकांची आहे. इंडोनेशियात करोनाबाधितांची संख्या ३० लाखांहून अधिक झाली आहे. तर, ८३ हजार मृतांची नोंद करण्यात आली आहे. इंडोनेशियात करोना महासाथीचा आजार सुरू झाल्यानंतर आतापर्यंत ८०० मुलांचा मृ्त्यू झाला आहे. त्यातील बहुतांशी मृत्यू मागील महिन्यात नोंदवण्यात आले आहेत.