Private Advt

डिलरशीपच्या नावाखाली तीन लाखांचा गंडा

झारखंडच्या भामट्याने वरणगावातील महिलेची केली फसवणूक : वरणगाव पोलिसात ठाण्यात संशयीताविरोधात गुन्हा

वरणगाव : वरणगावातील 34 वर्षीय महिलेची दोन लाख 97 हजार 506 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी याबाबत वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रेफ्रिजरेटरचा डीलर असल्याचे भासवून भामट्याने संपर्क साधत विश्वास संपादन करीत रक्कम उकळली मात्र प्रत्यक्षात इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा पुरवठा केलाच नाही.

एकाविरोधात पोलिसात गुन्हा
जयश्री धनराज महाजन (34, रा.मकरंद नगर, वरणगाव) यांना 17 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन ते 21 फेब्रुवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान त्यांना सुधीर शर्मा (रा.12 चौक, स्टेशन रोड, गिरीदिह, झारखंड) या नामक व्यक्तीने इंडिया मार्ट वरून बोलत असल्याचे सांगून स्वतः रेफ्रिजरेटरचा डीलर असल्याचे भासवले. जयश्री महाजन यांचा विश्वास संपादन झाल्यानंतर त्यांनी 37 रेफ्रिजरेटर, 7 एसी आणि एक वॉशींग मशीन अशी ऑर्डर दिली. ऑर्डर दिल्यानंतर जयश्री महाजन यांनी दोन लाख 97 हजार 507 रुपये ऑनलाईन पैसे पाठवले परंतु पैसे पाठवूनदेखील समोरील व्यक्तीने दिलेल्या ऑर्डरप्रमाणे कोणताही माल घरापर्यंत पोहोचविला नसल्याने त्यांनी वारंवार फोन केले. त्यानंतर त्यांना कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी तक्रार नोंदवल्यानंतर वरणगाव पोलिस ठाण्यात सुधीर शर्मा (पूर्ण नाव माहित नाही) या नामक व्यक्ती विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक आशिष अडसूळ करीत आहे.