Private Advt

डिझेलची परस्पर विक्री : त्रिकूटाविरोधात गुन्हा

चाळीसगाव : शहरातील जयप्रकाश पेट्रोलपंपावरून तीन जणांनी बसमध्ये न भरता इतर खाजगी वाहनात 67 लिटर डिझेल भरल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात एस.टी.महामंडळाच्या कर्मचार्‍यासह इतर दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

चक्क खाजगी वाहनात भरले डिझेल
चाळीसगाव बसस्थानक आगारात संभाजी भास्कर काळे (रा.सायगाव, ता.चाळीसगाव) हा नोकरीला आहे. 10 मे ते 14 मे दरम्यान संभाजी काळे याने चाळीसगाव शहरातील जयशंकर पेट्रोल पंपावर राज्य परीवहन मंडळाचे बस क्रमांक (एम.एच.20 बी.एल.2412), (एम.एच. 40 एन.9816), (एम.एच.20 बी.एल.2357) आणि (एम.एच.20 बी.एल.3507) क्रमांकाच्या बसमध्ये डिझेल न भरत परस्पर मौसीन सलीम शेख (रा.जुना विमानतळ, रेल्वे हाऊसिंग सोसायटी, चाळीसगाव), मयूर नामदेव म्हस्के (मराठी शाळेच्या मागे, खरजई नाका, चाळीसगाव) यांच्या मदतीने खाजगी वाहनात 67 लिटर डिझेल भरून चोरटी विक्री केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी चाळीसगाव आगार प्रमुख संदीप कृष्ण निकम यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिसात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक अमित बाविस्कर करीत आहे.