डावलेल्या दोन्ही ‘स्मार्ट संचालकां’ना पुनर्प्रवेश

0

सत्ताधारी भाजपने कुरघोडी करण्यासाठी प्रकल्प अंमलबजावणी समितीमधून दिला होता डच्चू
‘मनसे’चे सचिन चिखले, शिवसेनेचे प्रमोद कुटे यांचा समावेश: संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय

पिंपरी-चिंचवड : ‘स्मार्ट सिटी’च्या कामाला गती देण्यासाठी स्थापन केलेल्या प्रकल्प अंमलबजावणी समितीमध्ये मनसेचे सचिन चिखले व सेनेच्या प्रमोद कुटे या दोन्ही संचालकांना डच्चू देत सत्ताधारी भाजपने कुरघोडी केली होती. मात्र, त्यावरून आरोप झाल्यानंतर अखेर या दोघांना या समितीत घेण्याचा निर्णय सोमवारी स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. संचालक मंडळाचे अध्यक्ष व नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखालील बैठक महापालिका आयुक्तांच्या दालनात पार पडली. बैठकीला महापौर नितीन काळजे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.

दाखवला होता बाहेरचा रस्ता
केंद्र, राज्य शासनाच्या अधिकार्‍यांच्या बैठकीला येत नसल्याने स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकांना विलंब होऊन निर्णय प्रक्रिया रखडते. मात्र, प्रकल्पाला गती देण्यासाठी स्थानिक संचालकांची प्रकल्प अंमलबजावणी समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. त्या प्रमाणे समिती स्थापन करून त्यात संचालकांपैकी आयुक्त, महापौर, स्थायी समिती, सत्तारुढ पक्षनेते, विरोधी पक्षनेते यांचा समावेश करण्यात आला. मात्र, स्थानिक संचालकांपैकी सचिन चिखले व प्रमोद कुटे यांना डच्चू देण्यात आला होता.

सत्ताधार्‍यांच्या निर्णयावर संतप्त प्रतिक्रिया
नंतर सत्ताधार्‍यांनी ही कुरघोडी करत निर्णय प्रक्रियेपासून बाजुला ठेवल्याचा आरोप होऊ लागला होता. त्यामुळे अखेर या दोघांनाही प्रकल्प अंमलबजावणी समितीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक सत्ताधारी व विरोधी संचालकांपैकी सर्व संचालकांचा आता या अंमलबजावणी समितीत समावेश झाला आहे.

ममता गायकवाड, नयना गुंडे यांचाही समावेश
दरम्यान, अंमलबजावणी समितीत चिखले व कुटे यांचा समावेश करून घेण्यात आला. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड व पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्षा नयना गुंडे यांना संचालक मंडळात समावेश करून घेण्यात आला.

Copy