डांभूर्णी शेत-शिवारातून दहा हजारांचे ठिबक पाईप लांबवले

यावल : तालुक्यातील डांभूर्णी येथील शेत-शिवारातून ठिबक जोडणीसाठी ठेवलेल्या सुमारे दहा हजार रुपये किंमतीच्या 55 पाईपांची अज्ञाताने चोरी केल्याची बाब शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी यावल पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

शेती साहित्याच्या चोर्‍या वाढल्या
डांभूर्णी, ता.यावल येथील सुधाकर प्रल्हाद नारखेडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या डांभूर्णी शेत-शिवारातील शेत गट क्रमांक 614 मध्ये त्यांनी पिकास ठिबक नळ्याव्दारे पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने पाईप ठेवले होते. त्या ठिकाणी साडेनऊ हजार रुपये किंमतीचे 55 पाईपांचे नग होते ते पाईप कोणीतरी अज्ञात चोट्याने लांबवले. पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.