डंपर चालकाचा निष्काळजीपणा आरपीएफ जवानासह दोघांच्या जीवावर बेतला

नंदुरबार- डंपर चालकाचा निष्काळजीपणा आरपीएफ जवानासह दोघांच्या जीवावर बेतला. रस्त्यावर अवजड वाहन उभे करून पार्किंग लाईट सुरू न केल्याने मागून आलेल्या पेरिक्षाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात 2 जण ठार झाल्याची घटना नंदुरबार शहरातील भोणे फाट्याजवळ रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत पोलीस ठाण्याच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील भोणे फाटा हॉटेल गौरव पॅलेस जवळ डंपर (क्र. एमएच 41-सी 5498) वरील चालकाने वाहन उभे केले होते. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून जीवितास धोका निर्माण होईल व वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वाहनाचे पार्किंग लाईटच्या वापर न करता डंपर चालकाने वाहन उभे केल्याने याच परिसरातून आलेल्या एका पेरिक्षाने (क्र.एम.एच 18- 8351) डंपरला मागून ठोस दिली. या अपघातात आरपीएफ जवान चरणसिंग गावित (वय 49) रा. मंजुळा विहार, दुधाळे शिवार नंदुरबार व प्रवीण अंबालाल परदेसी (वय 38) यांना गंभीर दुखापत झाली.

अपघात झाल्यानंतर जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून दोघांना तपासून मृत घोषित केले. अपघातात पेरिक्षाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मृत आरपीएफ जवान चरणसिंग गावित दोंडाईचा येथे नौकरीला असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.