डंपरच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार तर एक गंभीर

0

फैजपूर। भरधाव वेगातील वाळू भरलेल्या डंपरने दुचाकीला उडवले. शनिवार 11 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास शहरातील अतिशय वर्दळीच्या छत्रीचौकात झालेल्या या अपघातामध्ये प्रसिद्ध किराणा व्यावसायीक अमर ब्रिजलाल वलेजा यांचा जागीच मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाला. अपघातानंतर डंपरने दुचाकीला फरफटत नेल्याने जीवित हानी झाली.

बाजारपेठ, दुकाने बंद; वाहतूक ठप्प
शहरातून गेलेल्या अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्यमार्गावर छत्री चौक आहे. या चौकातून सावदा, यावल, रावेर आणि भुसावळकडे जाता येते. त्यामुळे चौक नेहमी गर्दीने गजबजलेला असतो. शनिवार 11 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास शहरातील प्रसिद्ध किराणा व्यावसायीक अमर ब्रिजलाल वलेजा (वय 45) आणि हेमंत शांताराम सोनवणे हे दोघे दुचाकी क्रमांक एचएच-19 बीडब्ल्यू 3480 वरून छत्री चौकातून सुभाष चौकाकडे निघाले होते. नेमके यावेळी यावलकडून वाळू घेवून भरधाव वेगात सावद्याकडे निघालेल्या डंपर क्रमांक एमएच 19 झेड 4163)ने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकी ट्रकखाली सापडून लांब अंतरापर्यंत फरफटत गेली. त्यात दुचाकीवरील अमोल वलेजा यांचा जागीच मृत्यू झाला. तर हेमंत सोनवणे (वय 32, रा.पिंपरुड) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने शहरातील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. तर अमर वलेजा यांचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात येथे शवविच्छेदन करण्यात आले. गोपीचंद ब्रिजलाल वलेजा यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलिसात डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. अमर वलेजा यांचा अपघातामध्ये मृत्यू वार्ता शहरभर पसरताच व्यापारी पेठेवर अवकळा पसरली. संपूर्ण सिंधी व्यावसायीकांनी आपापली दुकाने बंद केली. त्यास इतरांनीदेखील प्रतिसाद दिल्याने बाजारपेठेत शुकशुकाट होता. अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड गर्दी जमली. यामुळे राज्यमार्गावरील दोन्ही बाजुची वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे एपीआय नेहेते, उपनिरीक्षक मनोहर मोरे, आधार निकुंभे आदींनी घटनास्थळी धाव घेतली.