डंपरची रीक्षाला जोरदार धडक : एक जण गंभीर

यावल : अवैधरीत्या वाळु वाहतूक करणार्‍या डंपरने रीक्षाला धडक दिल्याने केर्‍हाळेतील 42 वर्षीय इसम जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री 12.30 वाजता घडली. महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून तालुक्यात अवैध वाळू वाहतूक सुरू असतानाही ठोस कारवाई होत नसल्याने अवैध वाहतूकदारांचे फावले आहे. रविवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास किनगावकडून यावलकडे येत असलेल्या अवैध वाळु वाहतूक करणार्‍या डंपरने यावलकडून किनगावकडे जात असलेल्या अ‍ॅपेरीक्षा (क्रमांक एम.एच.19 ए.के.649) ला जोरदार धडक दिल्याने केर्‍हाळा, ता.रावेर येथील 42 वर्षीय इसम गंभीर जखमी झाला. तरुणांनी जखमीस तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर अधिक उपचारार्थ त्यास जळगाव येथे हलवण्यात आले. यावल पोलिसांना अपघाताची माहिती कळताच त्यांनी धाव घेतली मात्र डंपर चालक पसार झाला होता.

Copy