ट्वेन्टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघाची धुरा फिंचकडे

0

सिडनी: ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्या अनुपस्थितीत श्रीलंकेविरुद्ध संघाचे नेतृत्त्व आरोन फिंच करणार असल्याचे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाकडून जाहीर करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ याच काळात भारत दौऱ्याच्या तयारीत असल्याने श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. श्रीलंकेविरुद्धच्या आगामी ट्वेन्टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची धुरा फिंचकडे देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संपूर्ण संघाची घोषणा बुधवारी सकाळी केली जाणार आहे.

स्मिथ, मिचेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल, जोश हेजलवूड, उस्मान ख्वाजा आणि मिचेल मार्श हे खेळाडू भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तयारी करत असल्याने श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत यातील एकही खेळाडू खेळणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. २२ फेब्रुवारी रोजी श्रीलंकेविरुद्धचा शेवटचा ट्वेन्टी-२० सामना ऑस्ट्रेलियाचा संघ खेळणार आहे आणि त्याच्या दुसऱयाच म्हणजे २३ फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलियाचा भारतीय संघाविरुद्ध कसोटी सामना सुरू होणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड दुहेरी पेचात सापडले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या वेळापत्रकावर डेव्हिड वॉर्नरने याआधीच नाराजी व्यक्त केली होती. व्यस्त वेळापत्रकामुळे ऑस्ट्रेलियाच्या ट्वेन्टी-२० संघाचे नेतृत्त्व पुन्हा एकदा फिंचकडे चालून आले. याआधी देखील फिंचने संघाचे नेतृत्त्व केले आहे. पण क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये संघाचा एकच कर्णधार असावा या क्रिकेट बोर्डाच्या भूमिकेनंतर ट्वेन्टी-२० संघाचे नेतृत्त्व देखील स्टीव्ह स्मिथकडे सोपविण्यात आले होते. स्मिथच्या अनुपस्थित पुन्हा एकदा संघाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, असे फिंच म्हणाला.