ट्विट केल्याप्रकरणी सुर्यकुमार यादव अडचणीत

0

मुंबई : आंतरराज्य टी२० स्पर्धेत संघातून वगळण्यात आल्यानंतर रिट्विट केल्याप्रकरणी मुंबईचा आक्रमक फलंदाज सुर्यकुमार यादव चांगलाच अडचणीत सापडला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) नोटिस पाठवून याप्रकरणी खुलासा मागितला आहे. यामुळे आगामी विजय हजारे आंतरराज्य एकदिवसीय स्पर्धेसाठीही त्याच्या निवडीवर टांगती तलवार आली आहे. सुर्यकुमारने केलेल्या कृत्याचे एमसीएने गांभिर्याने दखल घेतली असून त्याला संघटनेच्या व्यवस्थापकीय समितीच्या बैठकीत उपस्थित राहण्यास सांगितले आहे. गतवर्षी मुंबई रणजी संघातून उपांत्य सामन्यात जय बिस्ताला बाहेर बसविल्यानंतरही त्याने नाराजी जाहीर केली होती. याविषयी त्याला तोंडी सूचना देऊन बजावले होते.

संघनिवडीबाबत बोलणे चुकीचे

गुणवान खेळाडू असूनही अनेकदा विविध वादांमुळे टीकेला सामोरे जावे लागणारा सुर्यकुमार आता नव्या वादात अडकला आहे. सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेतील कर्णधार आदित्य तरेच्या नेतृत्त्वाखालील मुंबई संघातून सुर्यकुमारला वगळले असल्याचा मेसेज स्तंभलेखक मकरंद वायंगणकर यांनी पोस्ट केला होता. यावर सुर्यकुमारने रिट्विट केले होते. यावरुन एमसीएने त्याला नोटीस पाठवली आहे. एमसीएचे संयुक्त सचिव उन्मेश खानविलकर यांनी सांगितले की, ‘खेळाडूंना सोशल नेटवर्किंगवर संघनिवडीबाबत अशाप्रकारे चर्चा करण्याची परवानगी नाही. आम्ही त्याला व्यवस्थापकीय बैठकीमध्ये उपस्थित राहण्यास सांगितले असून याप्रकरणी २४ तासांमध्ये त्याच्याकडून खुलासा मागितला आहे. सुर्यकुमारची बाजू पुर्ण जाणून घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येईल.’ सुर्यकुमार नक्कीच चांगला खेळाडू आहे. परंतु, शिस्त महत्त्वाची असून एकदिवसीय संघातील त्याची निवड तूर्तास थांबवली आहे,’ असेही खानविलकर म्हणाले.