ट्रॅक्टर चालवत राहुल गांधीची संसदेत एन्ट्री

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनावेळी सोमवारी सकाळी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी चक्क ट्रॅक्टर चालवत आल्याचे दिसले. त्यांच्यासोबत काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला, दीपेंद्र हुड्डा यांसह अनेक नेते यावेळी उपस्थित होते. काँग्रेस नेत्यांच्या हातात कृषी कायदे मागे घेण्याविषयी फलक होते. मात्र, संसद परिसरातून काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि बी. व्ही. श्रीनिवास यांना ताब्यात घेण्यात आले.
गेल्या आठ महिन्यांपासून केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. काँग्रेसनेही शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवत केंद्रातील मोदी सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत, अशी मागणी केली आहे. सरकार चर्चेसाठी तयार असले, तरी शेतकरी कृषी कायदे रद्दच झाले पाहिजेत, या मागणीवर ठाम आहेत. हा शेतकऱ्यांचा आवाज आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाहीए. सरकारला कृषी कायदे मागे घ्यावेच लागतील. हे काळे कायदे आहेत. शेतकऱ्यांवर खोटे आरोप केले जात आहेत. एवढेच नव्हे, तर त्यांना दहशतवादी म्हटले जात आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी यावेळी केली. तर, दुसरीकडे केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांची जंतरमंतरवर निदर्शने सुरू आहेत. दररोज २०० शेतकरी इथे येऊन शेतकऱ्यांच्या विरोधात एल्गार पुकारत आहेत. ९ ऑगस्टपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे.

 

Copy