Private Advt

ट्रॅक्टरसह ट्रॉली चोरणार्‍यांची टोळी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

ट्रॅक्टरसह नऊ ट्रॉली जप्त : आरोपींना 24 पर्यंत पोलीस कोठडी

यावल : जिल्ह्यातील मुक्ताईनगर, रावेर, यावल आणि जामनेर तालुक्यातील वेगवेगळ्या भागातून ट्रॅक्टर व टॉलीची चोरी करणारी टोळी जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकली असून चौघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. संजय तुकाराम धनगर (42, रा.नरवेल ता. मुक्ताईनगर), कलमी कमरोद्दीन शेख (42), प्रमोद सुकदेव महाजन (38) आणि गणेश वसंत महाजन (35, रा.अंतुर्ली, ता.मुक्ताईनगर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 24 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या
जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या नेतृत्वात सहाय्यक फौजदार विजय पाटील, राजेंद्र पाटील, अशोक महाजन, रविंद्र गायकवाड, वसंत लिंगायत, नरेंद्र वारूळे, प्रदीप पाटील, जयवंत चौधरी, विजय चौधरी, दीपक पाटील, उमेशगिरी गोसावी, किरण चौधरी, योगेश वराडे यांच्या पथकाने टोळीच्या मुसक्या आवळल्या.

चोरीच्या प्रयत्नात अडकले आरोपी जाळ्यात
धरणगाव आणि चोपडा तालुक्यात ट्रॉली चोरी करण्याच्या प्रयत्नात असतांना टोळीचा मोरक्या संजय तुकाराम धनगर (42, रा.नरवेल ता. मुक्ताईनगर) याला धरणगाव येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याची चौकशी केली असता त्याने कलमी कमरोद्दीन शेख (42), प्रमोद सुकदेव महाजन (38) आणि गणेश वसंत महाजन (35, रा. अंतुर्ली, ता.मुक्ताईनगर) या तीन सहकार्‍यांची नावे सांगितले. चौघांकडून आतापर्यंत एकूण चोरी केलेल्या 9 ट्रॉल्या आणि 1 ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. दरम्यान चौघांना ट्रॉली किंवा ट्रॅक्टर नाही मिळाली तर घरफोडी किंवा डीपीची चोरी करत असल्याची कबुली दिली आहे. चौघांना अटक करण्यात आली असून पुढील कारवाईसाठी यावल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ट्रॉली चोरी प्रकरणातील चार ही संशयीत आरोपींना यावल न्यायालयात हजर केले असता त्यांना न्या.एन.एस.बनचरे यांनी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार विजय पाचपोळे करीत आहे.