Private Advt

ट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्यांनी साखळीने बांधून धुतलं

नवी दिल्ली – पत्नीला ट्रिपल तलाक देणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. नागरिकांनी त्याची यथेच्छ धुलाई केल्याची घटना समोर आली आहे. गळ्यात चपलांचा हार घालून साखळीने बांधून मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पश्चिम बंगालच्या गोआलपोखर परिसरात ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गावातील लोकांनी या व्यक्तीच्या सासरच्या मंडळींसोबत बैठक घेत यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हा तरुण या बैठकीत सहभागी झाला नाही. यानंतर त्याच्या सासरच्या मंडळींनी त्याला शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. याच कारणामुळे आधी त्याला झाडाला बांधून मारहाण करण्यात आली. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 2 वर्षांपूर्वी चारघरिया येथील रहिवासी असलेल्या फिरोजाचं लग्न ड्रायव्हरचं काम करणाऱ्या तौफीक आलम नावाच्या एका व्यक्तीसोबत झालं. लग्नानंतर काही काळातच दोघांमध्ये वाद होऊ लागले.

वाद वाढल्याने अनेकदा तौफीकनं आपल्या पत्नीला मारहाण केली. मात्र ती सर्व सहन करत राहिली. जेव्हा तौफीकने तिला ट्रिपल तलाक दिला तेव्हा तिने आपल्या माहेरी फोन केला. यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तौफीकची यथेच्छ धुलाई केली. मुलीच्या कुटुंबीयांनी तौफीकच्या गळ्यात चपलांचा हारही घातला आणि त्याला जमिनीवर बसवलं. यादरम्यान कोणीतरी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ शूट केला, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.