टोकाचे मतभेद नाहीत

0

औरंगाबाद । आम्ही दोघे जीवलग मित्र आहोत. मतभेद होते ते लपवण्याचे काही कारण नाही. मात्र, टोकाचे मतभेद नाहीत, असे राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले. खासदार राजू शेट्टी आणि त्यांच्यातील मतभेदाबाबत ते बोलत होते. वेळ आलीच तर कोणते खत, कोणते बियाणे वापरावे याची जाण आहे, कोणत्या पाखरांना हाणायचे कळते. पिकावर येणार्‍या पाखरांना हाणण्यासाठी गोफण तयार आहे, ती भिरकावण्यासाठी सज्ज आहे, असा गर्भित इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला. तत्त्वाचा बुरखा पांघरूण फार दिवस राजकारण करता येत नाही असे म्हणत सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर पुन्हा एकदा निशाणा साधला तसेच राजू शेट्टींनी जर आपल्या मुलाचा प्रचार केला असता तर चित्र वेगळे असते असे सांगत सागर खोत यांच्या निसटत्या पराभवाबद्दल सदाभाऊ खोत यांनी खंत व्यक्त केली. मी आयुष्यात गांधी वाचला आहे. हिटलर वाचण्याची कधी इच्छाच झाली नाही. व्यक्तिस्वातंत्र्य द्या, ही महात्मा गांधींची शिकवण आहे. प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलं पाहिजे, प्रत्येकाच्या स्वातंत्र्याचा आदर करायला हवा. त्यामुळे सल्लागार कोण आहेत, हे नेतृत्वाने पाहावे, मला वेगळे काही करायचे नाही, असे सदाभाऊंनी नमूद केले.