टीम इंडिया आता दिसणार नव्या लुकमध्ये

0

नवी दिल्ली : भारतीय संघांच्या नव्या जर्सीचे नुकतेच अनावरण झाले. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघ नव्या जर्सीमध्ये दिसणार आहे. ‘बीसीसीआय’ने नुकतेच भारतीय संघांच्या नव्या जर्सीचे अनावरण केले असून याबद्दलची माहिती आणि छायाचित्र बीसीसीआयने आपल्या ट्विटर हॅण्डलवर ट्विट केले आहे. छायाचित्रात भारतीय पुरूष आणि महिला संघातील मुख्य खेळाडू नव्या जर्सीमध्ये दिसतात. भारतीय संघाच्या जर्सीत निळा रंग कायम राखण्यात आला असून जर्सीच्या हाताजवळच्या रंगात बदल करण्यात आला आहे. हाताजवळ गडद निळा रंग देण्यात आला असून त्यास जोड म्हणून तिरंग्याची पट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत नव्या कर्णधारासह नव्या जर्सीत दिसेल.

महिला खेळाडूंना देखील सेम जर्सी
महेंद्रसिंग धोनीने भारताच्या एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० संघाच्या कर्णधार पदावरून पायउतार होण्याचा निर्णय गेल्याच आठवड्यात जाहीर केला. त्यानंतर संघाचे नेतृत्त्व विराट कोहलीकडे सोपविण्यात आले आहे. कोहली कसोटी संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी यशस्वीरित्या हाताळत आहे. त्याचप्रमाणे एकदिवसीय संघालाही तो आपल्या नेतृत्त्वात नवी उंची गाठून देईल अशी भारतीय चाहत्यांची आशा आहे. कोहलीच्या नेतृत्त्वात भारताने अद्याप एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. आता इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकून कोहलीच्या एकदिवसीय संघाच्या नेतृत्त्वाची सुरूवात देखील दमदार होईल, अशी आशा आहे. धोनीने कर्णधारपद सोडले असले तरी भारतीय संघाच्या जर्सीचे अनावरण करताना प्रसिद्ध करण्यात आलेल्या छायाचित्रात संघातील अनुभवी खेळाडू म्हणून मध्यभागी धोनीलाच स्थान देण्यात आले आहे. तर त्याच्या उजव्या बाजूला कोहली, तर डावीकडे अजिंक्य राहणे नव्या जर्सीत उभे आहेत. या दोघांसोबत आर. अश्विन देखील छायाचित्रात आहे आणि तीन महिला खेळाडू आहेत.