टीम इंडियाच्या विक्रमी ७५९ धावा; ७ वा सर्वोत्कृष्ट धावांचा डोंगर

0

चेन्नई – इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात करुण नायरने धडाकेबाज त्रिशतक लगावून आपली क्षमता सिद्ध केली आहे. या त्रिशतकाच्या जोरावर भारताने इंग्लंडविरुद्ध ७५९ धावा केल्या. भारतीय संघाची एका डावातील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. करुणच्या शतकानंतर भारताने डाव घोषित केला. करुणने वनडे स्टाईल खेळी करत आपला वैयक्तिक स्कोर करतानाच संघालाही विक्रमी धावसंख्या बनवून दिली. चिदम्बरम मैदानावर सुरू असलेल्या कसोटीचा चौथ्या दिवशी करुणच्या फटकेबाजीने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत सर्वबाद ४७७ धावा केल्या होत्या. लोकेश राहुलच्या हुकलेल्या द्विशतकानंतर नायरच्या त्रिशतकाने भारतीय क्रिकेटप्रेमींना पर्वणीच दिली. नायरला आश्विन व जडेजाने अर्धशतक बनवून चांगली साथ दिली. नायरचे त्रिशतक बनताच टीम इंडियाने डाव घोषित केला. टीम इंडियाने २८२ धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडने सावध सुरुवात करत पडझड होऊ न देता १२ धावा केल्या आहेत. सामन्याचा मंगळवारी शेवटचा दिवस असून भारतीय फिरकीवर मदार आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून इंग्लंडला व्हाईटवॉश देण्याची संधी आहे.

चेन्नईत ‘नायर’ नावाची त्सुनामी
नुकत्याच आलेल्या समुद्री वादळानंतर चेन्नईत नायर नावाच्या नव्या वादळाची झलक चेन्नईकरांना बघायला मिळाली. २५ वर्षाच्या नायरने आश्वासक फलंदाजीचा नमुना सादर करत प्रेक्षकांना अगदी खिळवून ठेवले. ७९.८३ च्या जबरदस्त रनरेटने नायर इंग्लंडच्या गोलंदाजांवर तुटून पडला होता. नायरने इंग्लंडच्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवत कसोटी कारकिर्दीतील आपले पहिलेवहिले त्रिशतक झळकावले. भारतीय संघाच्या या नव्या दमाच्या खेळाडूने आपल्या अफलातून खेळीच्या जोरावर भारतीय संघाला इंग्लंडसमोर ७ बाद ७५९ धावांचा डोंगर उभारता आला. भारतीय संघाकडे २८२ धावांची भक्कम आघाडी आहे. विशेष म्हणजे, आपल्या तिसऱ्याच आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात शतक ठोकून त्रिशतकापर्यंत मजल मारणारा करुण नायर हा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. करुण नायर याने ३२ चौकार आणि ४ खणखणीत षटकारांच्या जोरावर केवळ ३८३ चेंडूत नाबाद ३०३ धावांची खेळी साकारली. नायरचे त्रिशतक पूर्ण झाल्यानंतर भारताने आपला डाव ७५९ धावांवर घोषित केला.

हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे. महत्वाच्या क्षणी ही खेळी झाल्याने अधिक आनंद झाला आहे. राहुल, आश्विन आणि जडेजाने मला मोलाची साथ आणि प्रेरणा दिली. पहिले शतक हे खूप महत्वाचे असते. भविष्यातील खेळासाठी ही गोष्ट सकारात्मक एनर्जी देते. देशवासियांसोबत माझ्या परिवाराला ह्या गोष्टीचा अत्यंत आनंद झाला आहे. राहुलचे द्विशतक झाले नाही याची मनाला मोठी खंत आहे. यापुढेही हाच फॉर्म कायम ठेवला जाईल यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार आहे. या खेळीसाठी अर्थातच आमचे प्रशिक्षक अनिल कुंबळे, फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर आणि कर्णधार विराट कोहली तसेच संपूर्ण टीमचा सपोर्ट महत्वाचा आहे.
करुण नायर

अश्विन, जडेजाची साथ महत्वाची
करुणला रविचंद्रन अश्विनने सुरेख साथ दिली. अश्विनने ५४ धावा केल्या. या जोडीने सहाव्या गड्यासाठी १४७ धावा केल्या. भारताने आज ३९१ धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. मुरली विजय २९ धावा करून बाद झाल्या. त्यानंतर अश्विन-करुण जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजांना संधीच दिली नाही. चेतेश्वर पुजारा (१६) आणि कर्णधार विराट कोहली (१५) यांचे खास योगदान ठरले नाही. यानंतर आलेल्या रवींद्र जडेजाने देखील धमाकेदार ५१ धावांची खेळी केली. भारताने डाव घोषित करण्यापूर्वी भारताचे ७ गडी तंबूत गेले होते. करुणच्या त्रिशतकानंतर डोव घोषित करण्यात आला आणि इंग्लंड संघाला फलंदाजासाठी पाचारण करण्यात आले. सलामी फलंदाज केईटोन जेन्नईंग आणि अॅलिस्टर कुक यांनी अनुक्रमे ९ आणि ३ धावा केल्या. दिवसभराचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने १२ धावा केल्या होत्या. दरम्यान, पाच कसोटी सामन्यात भारत ३-० ने आघाडीवर आहे.

मोठ्या विजयाच्या रेकॉर्डपासून पाक वंचित
ब्रिस्बेन : असद शफीकच्या 137 धावांच्या झुंजार खेळीनंतरही पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाकडून 39 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. ब्रिस्बेनमधील अतिशय रोमांचक सामन्यात पाकिस्तान इतिहास रचण्यापासून वंचित राहिला. मिचेल स्टार्कच्या शानदार बाऊन्सरवर असद शफीक बाद झाला आणि सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकला. त्यानंतर यासिर शाह 33 धावांवर धावचित झाल्याने पाकिस्तानचा डाव संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 490 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानला 450 धावा करता आल्या. पाकिस्तानने हा सामना जिंकला असता तर कसोटी क्रिकेटमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना हा सर्वात मोठा विजय ठरला असता. परंतु एवढ्या धावा करुनही सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम करण्यापासून पाकिस्तानचा संघ हुकला. कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या डावात आव्हानाचा पाठलाग करण्याचा विक्रम वेस्ट इंडीजच्या नावावर आहे. विंडीजने 2003मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 418 धावा केल्या होत्या. सलामीवीर अजहर अली (71 धावा) आणि युनुस खान (65 धावा) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्तानचा संघर्ष सुरुच होता. यानंतर असद शफीकचा सामन्याची सूत्रं हातात घेतली आणि अखेरपर्यंत लढा दिला. परंतु त्याचा लढा अपयशी ठरला.