टीम इंडियाची आता ‘विराट’ वाटचाल

0

मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली असून एकदिवसीय आणि टी-२० संघाच्या कर्णधारपदाचा महेंद्रसिंह धोनीने राजीनामा दिल्यानंतर विराट कोहलीकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. विराट कोहलीच कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार झाला आहे. एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील सीनियर निवड समितीच्या बैठकीत भारतीय संघ जाहीर करण्यात आला. सिक्सर किंग युवराज सिंहचे टीम इंडियामध्ये कमबॅक झाले आहे. तर दिल्लीचा डावखुरा सलामीवीर शिखर धवनचा एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे. भारताच्या टी-२० संघात सुरेश रैना आणि आशिष नेहराचा समावेश झाला आहे. मुंबईकर फलंदाज अजिंक्य रहाणे तसेच अष्टपैलू रविचंद्रन अश्विन हे दोघेही दुखापतीतून सावरले असून, रहाणे एकदिवसीय मालिकेत तर अश्विन एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत सहभागी होईल.

युवराज सिंगला संघात स्थान
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी ट्वेंटी मालिकेसाठी भारतीय संघाची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. महेंद्रसिंह धोनीनंतर कर्णधारपदावर कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष होते. अपेक्षेनुसार विराट कोहलीकडे कर्णधारपद सोपवण्यात आले असून युवराज सिंगला संघात स्थान मिळाले आहे. कसोटी मालिकेनंतर नववर्षानिमित्त मायदेशी परतलेला इंग्लंड संघ आता एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी मालिकेसाठी पुन्हा भारतात येणार आहे. इंग्लंडचा संघ तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी शुक्रवारी भारतीय संघाची निवड करण्यात आली. अनुभवी डावखुरा फलंदाज युवराजसिंगला एकदिवसीय आणि ट्‌वेंटी-20 मालिकेसाठी संघात स्थान मिळाले आहे. रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांना एकदिवसीय संघात स्थान मिळालेले नाही.

अपेक्षेप्रमाणे कोहलीकडे कर्णधारपद
महेंद्रसिंग धोनीने तडकाफडकी कर्णधारपदाचा सोडचिठ्ठी दिल्याने ही धूरा कोणाकडे दिली जाते याची उत्सुकता होती. कसोटी संघाचे नेतृत्व करणा-या विराट कोहलीकडे मर्यादित षटकांच्या संघाचे कर्णधारपद सोपवले जाईल अशी शक्यता होती. अपेक्षेप्रमाणे शुक्रवारी समितीने कोहलीकडे कर्णधारपद दिले. याशिवाय स्थानिक पातळीवर चमकदार कामगिरी करणा-या युवराज सिंगलाही भारतीय संघात स्थान मिळाले आहे. सुरेश रैना आणि आशिष नेहराला टी ट्वेंटी संघात संधी मिळाली आहे. धडाकेबाज फलंदाज आणि तरुण यष्टिरक्षक ऋषभ पंतला ट्‌वेंटी-20 साठी संघात स्थान मिळाले आहे. ऋषभ पंत हा यष्टिरक्षकही आहे. त्यामुळे आगामी काळात महेंद्रसिंह धोनीनंतरचा पर्याय म्हणून पंतकडे पाहिले जाऊ शकते.

बैठकीत संभ्रम निर्माण
शुक्रवारी निवड समितीच्या बैठकीत संभ्रम निर्माण झाला होता. एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमध्ये पाच जण आहेत. लोढा समितीने तीन सदस्यांचा निवड समितीमध्ये समावेश करण्याची शिफारस केली होती. त्यामुळे निवड समितीच्या बैठकीत नेमके किती सदस्य असावेत याविषयी संभ्रम होता. यामुळे समितीची पत्रकार परिषदही पुढे ढकलण्यात आली. शेवटी लोढा समितीकडून हिरवा कंदील आल्यावर समितीची बैठक पार पडली.

फिरकी गोलंदाजांवर विशेष भर
एकदिवसीय आणि ट्‌वेंटी-20 या दोन्ही संघांमध्ये भारताने फिरकी गोलंदाजांवर भर दिले आहे. एकदिवसीय संघात आर. आश्‍विन, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा हे नियमित गोलंदाज आणि युवराजसिंग, केदार जाधव हे पार्ट-टाईम फिरकी गोलंदाज निवडले आहेत. विशेष म्हणजे, अनुभवी सुरेश रैनाला एकदिवसीय संघातून वगळण्यात आले आहे. के. एल. राहुल आणि केदार जाधव यांच्यासह मनीष पांडेला या संघात स्थान मिळाले आहे. ट्‌वेंटी-20 साठीच्या संघात आश्‍विन, जडेजा यांच्यासह युझवेंद्र चहल या तरुण गोलंदाजाला संधी देण्यात आली आहे. यांच्यासह युवराजसिंग आणि सुरेश रैना हे पार्ट-टाईम गोलंदाज असतील.

विराटचा धोनी प्रती आदर
विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यात क्रिकेटच्या मैदानावर आणि मैदानाबाहेर चांगले नाते असून अचानकपणे धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही सूत्रे आता विराटकडे येतील. धोनीने अचानक हा निर्णय़ जाहीर केल्यानंतर क्रिकेट वर्तुळातूनच नव्हे सर्वच स्तरातून प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या. धोनीप्रती कसोटी कर्णधार विराट कोहलीनेही आदर व्यक्त केला असून ट्विटरवरुन विराटने धोनीच्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. धोनी असा कर्णधार होता ज्याच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंना खेळण्याची इच्छा आहे. धोनी माझ्यासाठी नेहमीच कर्णधार असेल. खूप खूप धन्यवाद, असे त्याने ट्विटरवर म्हटले आहे.

वन डे मालिकेसाठी भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, के एल राहुल, महेंद्रसिंह धोनी, मनिष पांडे, केदार जाधव, युवराज सिंग, अजिंक्य रहाणे, हार्दिक पंड्या, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अमित मिश्रा, जसप्रित बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव टी ट्वेंटी मालिकेसाठी भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, मनदीप सिंह, के एल राहुल, युवराज सिंग, सुरेश रैना, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, आर अश्विन, रविंद्र जडेजा, युजवेंद्र चहल, मनिष पांडे, जसप्रित बुमराह, भुवनेश्वर कुमार, आशिष नेहरा