टाळी झिडकारण्याचे राजकीय गणित

0

शिवसेना आणि भाजपाची युती तुटल्यानंतर एकच चर्चा सुरू झाली की, आता शिवसेना मनसेला सोबत घेणार का? अगदी विश्‍वसनीय सूत्रांच्या हवाल्याने बातम्याही आल्या की मनसे शिवसेनेला 177 जागा सोडायला तयार असल्याच्या. काहीवेळा हसायला यावे अशीच ही सारी चर्चा असते. पुढे सारी चर्चा फोल ठरते आणि राजकारण्यांना जे पाहिजे असते तेच ते करून मोकळे होतात. या वेळीही तसेच झाले. शिवसेनेने मनसेशी युतीचे पतंग माध्यमांमध्ये बदलू दिले आणि मग अचानक स्वबळाच्या मांजाने कापून टाकले.

शिवसेनेने मनसेला नकार दिल्यानंतर आता पुन्हा चर्चा सुरू झाली आहे की शिवसेनेने हे असे का केले? भाजप गेलेली असताना मनसेला सोबत घेण्यात गैर काय होते? तशी आपण माणसे खूपच भावनाप्रधान असतो. त्यामुळे दुरावलेले एकत्र येणे आपल्याला खूपच भावते. त्यात पुन्हा सामान्य माणूस म्हणून आपले गणित हे शाळेत शिक्षकांनी शिकवलेले साधेसरळ गणित असते. दोन अधिक दोन दोन बरोबर चारवाले. येथे राजकीय गणितातील समीकरणे भलतीच असतात. फारच वेगळी. येथे दोन अधिक दोन बरोबर चार सोडून काहीही असू शकते. त्याचवेळी दोन वजा एक बरोबर एक असे सरळसोट उत्तर येण्याऐवजी दोन वजा एक बरोबर चार असेही समीकरण मांडले जाऊ शकते. कोणाला तरी वगळल्याने कमी होणे हे आपले सामान्य गणित आणि कोणाला तरी वगळल्याने दुसरीकडून आपोआपच वेगळी कमाई होऊन एकाला वगळूनही संख्याबळ वाढणे हे राजकीय गणित. तुम्हा-आम्हा सामान्यांच्या डोक्यावरून जाणारे!

शिवसेनेच्या मनसेशी युतीच्या चर्चा तसे हे साधे गणित येणार्‍यांनाही तशा चक्रावणारेच. त्यामुळेच मनसेकडून युतीच्या चर्चा रंगवल्या जात असताना तसे भावनात्मक राजकारणच करणारे शिवसैनिक या वेळी जराही गहिवरलेले दिसत नव्हते. नेते तर सोडाच. कारणही तसेच असावे. काहींनी ते मांडलेही. जेव्हा शिवसेनेचा वाईट काळ होता. तेव्हा मनसेने जेवढे नुकसान करता येईल ते केले. अगदी विधानसभेला अचानक भाजपाने युती तोडली तेव्हाही मनसेने शिवसेनेला साथ दिली नाही. त्या अचानकच्या एकाकी लढतीत मराठी माणसाने साथ दिली. शिवसेना मोदी लाट असूनही 63 जागी विजयी झाली. त्याचवेळी मनसेच्या इंजिनाची वाफच गेली. हा मराठी माणसाचा कौल खूप काही सांगणारा होता. आता पुन्हा अस्तित्व गमावत चाललेल्या मनसेला सोबत घेऊन जिवंत करायचे म्हणजे स्वत:साठीच धोका निर्माण करण्यासारखे ठरणारे. त्यामुळेच बहुधा शिवसेनेने भाजपला प्रतिसादच दिला नाही.

या वेळी घडले ते सारे वेगळेच. मागे एकदा उद्धव ठाकरे यांनी स्वत:हून टाळी मागितली होती. पण टाळी काही मिळाली नाही. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी स्वत:हून टाळी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, टाळी मिळणे दूरच. उद्धव ठाकरे यांनी ती टाळी झिडकारून लावली. यातही सर्व धमालच. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांचे म्हणणे आमचे साहेब फोन करत होते. त्यानंतर मी स्वत: मातोश्रीवर गेलो. मला उद्धव ठाकरे भेटले नाहीत. मात्र, शिवसेनेचे नेते भेटले. त्यांच्याशी चर्चा झाली, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसांच्या भल्यासाठी मनसे पुढे आली. मनसे लहान भाऊ म्हणून युती करायला तयार आहे. शिवसेना ज्या जागा देईल त्या घ्यायला तयार आहोत. तसे शिवसेनेच्या नेत्यांना सांगितले होते, असेही नांदगावकर यांनी सांगितले. महाराष्ट्राची अस्मिता मनसेसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे मराठी माणसाने एकत्र यावे असे वाटले म्हणून मी हा प्रस्ताव घेऊन मातोश्रीवर गेलो होतो. मात्र, उद्धव ठाकरे यांनी प्रस्तावच मिळाला नसल्याचे आणि स्वबळावरच लढण्याचे म्हटल्याने दोन्ही भावांना एकत्र आणण्याचा माझा प्रयत्न अयशस्वी ठरला, असे म्हणावे लागेल, असे बाळा नांदगावकर हतबलतेने म्हणाले.

मुळात बाळा नांदगावकर हे तसे प्रामाणिक मराठी प्रेमी नेते. प्रथम शिवसेनाप्रमुखांवर नंतर राज ठाकरेंना आपला विठ्ठल मानून भजणारे. मात्र, आता त्यांनी जरी हतबलता व्यक्त केली असली, तरी शिवसेनेच्या मनात त्यांच्या पक्षाबद्दल आणि नेत्यांबद्दल एक वेगळाच अविश्‍वास आहे. शिवसेना नेत्यांशी बोलताना तो सहजच कळतो. त्यांचे म्हणणे, आता मनसे दखलपात्र पक्षच उरलेला नाही. त्यांनी 2009मध्ये मराठी मते विभागून शिवसेनेचे जे करायचे नुकसान ते केले. त्यानंतरही 2014ला आम्ही भाजपाविरोधात लढताना मराठी मते विभागायचा प्रयत्न केला. मराठी माणसाने मात्र मनसेला थारा दिला नाही. आता पुन्हा जर मनसेला जवळ केले, तर भविष्यासाठी आम्हीच शिवसेनेसाठी दुखणे विकत घेतल्यासारखे होईल. त्यापेक्षा आता स्वबळावर लढून स्वत:च्याच पक्षाला अधिक वाढवणे योग्य.
एकूणच शिवसेनेला आता मनसे हे विकतचे दुखणे वाटते. त्यामुळे नको. भाजपाशी युती तोडून झालेली वजाबाकी किमान 90 जास्त जागा देण्याचे बळ देणारीही ठरली आहे. त्या प्रभागांमध्ये शिवसैनिक किंवा मग दुसर्‍या पक्षांमधून येणारे प्रबळ उमेदवार, मग त्यात अगदी मनसेतूनही येणारे शिवसेनेचे उमेदवार असू शकतात. त्यामुळे शिवसेना मनसेशी युती करून स्वबळ वाढवण्याची ही संधी गमावू इच्छित नसावी. अशावेळी भावना वगैरे आवरायच्या असतात हे राजकीय शहाणपण राजकीय गणिते सोडवताना आपोआपच येते. शिवसेनेलाही ते आलेच आहे. त्यामुळेच मिळालेली टाळी झिडकारून शिवसेनेने वजाबाकी वाढवली नाही, तर बेरीजच केल्याचे त्यांच्या नेत्यांना वाटत आहे. खरे उत्तर काय ते 23 फेब्रुवारीला कळेलच!