टाकळी प्र.चा.येथे सुनेचा सासर्‍यानेच केला खून : आरोपीला अटक

Daughter-in-law killed by father-in-law in Takli : Accused Arrested चाळीसगाव : सुनेने सासर्‍यास अपमानास्पद वागणूक दिल्याने संतप्त सासर्‍याने सुनेचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना चाळीसगाव तालुकयातील टाकळी प्र. चा. येथील शिवशक्ती नगरात शुक्रवारी रात्री घडली. खुनाच्या घटनेनंतर सासरा उत्तम पुंजाजी चौधरी हा पोलिसांना शरण आला. या घटनेत कविता गोकुळ चौधरी (25, शिवशक्तीनगर, टाकळी प्र.चा.) यांचा मृत्यू झाला.

कौटुंबिक वाद अखेर बेतला जीवावर
चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र. चा. येथील रहिवासी उत्तम पुंजाजी चौधरी यांचा मुलगा प्रा.गोकुळ उत्तम चौधरी याचा विवाह शिरपूर तालुक्यातील टेकवाडे येथील कविता यांच्याशी झाला होता. सून व सासरच्या लोकांचे काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होते. त्यातच कविता माहेरी निघून गेल्यानंतर 29 सप्टेंबर रोजी पती गोकुळ कवितास आणण्यासाठी टेकवाडे येथे गेला. रात्री 9 वाजता ते दोन मुलांसह चाळीसगावी आले होते.

दोन्ही हातांनी गळा, नाक व तोंड दाबून जीवे ठार मारले
शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास उत्तम चौधरी घरी आले. त्यांनी सून कवितास चहा करण्यास सांगितले. चौधरी चहा घेत टीव्ही पाहत असताना सायंकाळी 5.30 वाजता कविता आली व तिने टीव्ही बंद करून सासर्‍यास अपमानजनक बोलल्याने चौधरी यांना राग आला. त्यांनी कविताला बेडवर ढकलून दोन्ही हातांनी तिचा गळा, नाक व तोंड दाबून तिला जीवे ठार मारले. त्यानंतर सासरे उत्तम चौधरी हे स्वत:च रीक्षातून शहर पोलिस ठाण्यात गेले व त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. सून कविता हिचे सोबत नेहमी होत असलेल्या कौटुंबिक वादाच्या कारणावरून मी तिला जीवे ठार मारल्याचे पोलिसांना सांंगितल्यानंतर आधी त्यांच्याच फिर्यादीनुसार स्वतःविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली आहे.