टाकळीच्या ग्रामसेवकावर गुन्हा दाखलची मागणी

0

चाळीसगाव । तालुक्यातील टाकळी प्र.दे.येथे 16 सप्टेंबर 2013 रोजी आठवडे बाजाराच्या लिलावाचे पैसे घेऊन परस्पर वापरणार्‍या तत्कालीन ग्रामसेवक ईश्वर भोई यांच्यावर भ्रष्टाचार केल्या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी टाकली प्र.दे.चे माजी सरपंच सदस्य व ग्रामस्थांनी तक्रारी अर्जाद्वारे जिल्हा परीषदेच्या अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देण्यात आले आहे. ग्रामसेवक भोई यांनी आणखी काही ग्रामस्थांकडून अश्याच स्वरूपाची रक्कम घेऊन खोटे दाखले दिले असल्याचे सांगण्यात आले असून तत्कालीन ग्रामसेवक भोई यांचे वर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करावे अशी मागणी करण्यात आली.

माजी सरपंचासह सदस्यांची करवाईची मागणी
टाकळी प्रदे च्या माजी सरपंच कविता प्रशांत मगर, सदस्य कल्याण धनराज सूर्यवंशी व गोविंदा पुणाजी पाटील यांनी दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे कि, टाकली प्रदे ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक ईश्वर शांतीलाल भोई हे सन 2013 ला कार्यरत असतांना आठवडे बाजार लिलाव प्रक्रीसाठी त्यांनी गोविंदा पुनाजी पाटील यांचेकडून लिलावाची रक्कम म्हणून 16 सप्टेंबर 2013 रोजी रोख 7 हजार रुपये व 10 मार्च 2014, 15 हजार 500 असे एकूण 22 हजार 500 रुपयाची वसुली एका कोर्‍या कागदावर स्व हस्ताक्षराने लिहून त्यांची स्वाक्षरी व शिक्का मारून गोविंदा पाटील यांना पोच पावती दिली परंतु तशा आशयाची वसुलीची कुठलीही नोंद टाकळी प्रदे ग्रामपंचायत मध्ये दिसून येत नाही अथवा बँकेत भरणा केलेला दिसत नाही. सदर रक्कम हि तत्कालीन ग्रामसेवक ईश्वर भोई यांनी गेल्या 3 वर्षांपासून स्वतःसाठी वापरात आहेत व गोविंदा पाटील यांनी पैसे भरलेले असतांना देखील ते ग्रामपंचायत च्या दप्तरी थकबाकीदार दिसत आहेत.