झोपडपट्टीवासीयांची नोंदणी करणार

0

मुंबई । शहरातील सर्व झोपडपट्टीधारकांची नोंदणी करण्याच्या अनुषंगाने परिशिष्ट तयार करण्याचे काम मुंबई मनपा व एसआरएच्या माध्यमातून सुरू आहे. रेल्वेच्या जमिनीवरील झोपडपट्ट्यांच्या परिशिष्ट अद्याप तयार करण्यात आले नाही. त्यामुळे त्यांचेही पुनर्वसन करता यावे यासाठी परिशिष्ट तयार करण्यात येणार असून, तसे आदेश संबंधित यंत्रणांना देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुंबईकरांना चांगली रेल्वे वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी एमयूटीपी-3 प्रकल्पासाठी सरकारने त्वरीत निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून अतुल भातखळकर, पराग अळवणी यांनी उपस्थित केली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली.

रेल्वे आणि मेट्रो प्रकल्प केंद्राच्या एमयूटीपी योजनेअंतर्गत राबविण्यात येतो. त्यासाठी एमएमआरडीएकडून योग्य त्या निधीची तरतूद आणि नियोजन करण्यात येते तसेच राबवण्यात येत असलेल्या प्रकल्पामध्ये प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या पुनर्वसनाचा खर्च ही प्रकल्पाच्या किमतीत समाविष्ट असतो. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी कोणताही वेगळा खर्च लागत नसल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी भाजपचे पराग अळवणी यांनी उपप्रश्न विचारत मुंबईतील रेल्वेच्या हद्दीतील जागेवर मोठ्या प्रमाणावर झोपडपट्ट्या वसलेल्या आहेत. मात्र, त्यांचे पुनर्वसन केले जात नाही. या अनुषंगाने केंद्र सरकारच्या धोरणानुसार पुनर्वसनासाठी रेल्वे विभागाकडून जागा घेऊन त्याठिकाणी झोपडीधारकांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र सरकारच्या धोरणानुसार सर्व विभागांनी या अनुषंगाने धोरण तयार केलेले नाही.

पात्रता निश्‍चितीला प्राधान्य
मुंबईतील झोपडपट्ट्याच्या अनुषंगाने संरक्षण विभाग व रेल्वे विभागाच्या मंत्र्यांसोबत बैठक झाली आहे. त्यांनी यासंदर्भात तत्त्वत: मान्यताही दिली आहे. मात्र, त्यांच्या विभागाकडून जमिनी ताब्यात घेणे, त्याविषयीचा प्रस्ताव पाठवणे यात बराच काळ जाणार असल्याने ते शक्य नाही. त्यांचे परिशिष्ट तयार करून त्यांची पात्रता निश्‍चित करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.