झाकीर नाईकच्या संस्थेला दाऊदची आर्थिक रसद

0

मुंबई : इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन (आयआरएफ) या संस्थेला कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमकडून आर्थिक रसद पुरविण्यात आल्याची खळबळजनक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. वादग्रस्त मुस्लिम धर्मोपदेशक झाकीर नाईक याची ही संस्था आहे. नाईकचे आर्थिक व्यवहार सांभाळणारा आमिर गजधरची पोलिस चौकशी करत असताना ही माहिती उघड झाली आहे. सक्तवसूली संचलनालयाने आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांखाली 16 फेब्रुवारीला गजधरला ताब्यात घेतले होते. पोलिसांना माहिती देताना गजधरने सांगीतले की, आतापर्यंत झाकीर नाईकच्या संस्थेसाठी मी 200 कोटी रूपयांचे व्यवहार हाताळले आहेत. उत्त्पन्नाचा स्रोत लपविण्यासाठी या संस्थेने बनावट कंपन्या सुरू केल्या होत्या. त्यापैकी सहा कंपन्यांचा संचालक म्हणून मी काम पाहत होतो. त्यातील चार कंपन्या भारतातील असून दोन कंपन्या परदेशातील आहेत. दाऊद इब्राहिम आणि या संस्थेचे घनिष्ठ संबंध आहेत. हे सर्व व्यवहार ‘हवाला’मार्फत झाले होते आणि त्यामध्ये सुलतान अहमद हा मध्यस्थ म्हणून काम करत होता.

नाईकच्या भोवती फास आवळला
दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याबद्दल एनआयएने नाईकवर गेल्या महिन्यात गुन्हा दाखल केला आहे. मुस्लीम तरुणांना भडकवण्याचे काम केल्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांनीही त्याच्यावर गुन्हा दाखल केला. या तपासाचा पुढील भाग म्हणून अंमलबजावणी संचालनालयाने नाईकला समन्स बजावत जानेवारीच्या अखेरपर्यंत हजर होण्याचे आदेश दिले होते. मात्र, नाईक ईडीच्या समोर हजर झाला नाही. पोलिसांनी अटक करू नये म्हणून तो सौदी अरेबियात लपून बसल्याचे सांगण्यात येत आहे. नाईकने अवैधरीत्या पैसे कुठून जमवले आहेत व त्यांचा गुन्ह्यांसाठी वापर कसा केला आहे याचा संचालनालय सध्या शोध घेत आहे. यासाठी नाईकच्या घरातून व कार्यालयातून हस्तगत केलेली अनेक कागदपत्रेही तपासण्यात आली आहेत.

दुबईमार्गे भारतात पैसा आणला
झाकीर नाईकच्या आयाआरएफ संस्थेच्या अंतर्गत येणार्‍या पीस टीव्हीसाठी साधनसामुग्री खरेदी करण्यासाठी नाईक आणि आयआरएफमध्ये गजधरने 200 कोटी रूपयांचे अदानप्रदान केले होते. दाऊदने आयआरएफला मोठ्याप्रमाणावर निधी दिला होता. पाकिस्तान आणि दुबईमार्गे हा पैसा आणण्यात आला होता. याशिवाय, हवालामार्फत पैसा पुरविण्यासाठी कराची येथील काही उद्योगपतींनी मदत केल्याची माहितीही ईडीला मिळाली आहे. आयआरएफला सौदी अरेबिया, ब्रिटन, आफ्रिकन देशांमधूनही पैसा मिळत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

पैशांची मोठ्या प्रमाणात हेराफेरी
यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाकडून झाकीर नाईकलाही समन्स बजावण्यात आले होते. चिथावणीखोर भाषणे करून तरुणांना दहशतवादाकडे वळवण्यास प्रवृत्त केल्याचे झाकीर नाईकवर आरोप झाल्यानंतर सरकारने त्याच्या ‘पीस टीव्ही’ या वाहिनीवर आणि संकेतस्थळांवर बंदी घातली होती. एनआयए तसेच मुंबई पोलिसांनी त्याच्या मुंबईतील मालमत्तांवर छापा टाकून तपासणीही केली होती. नाईकने त्याच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेमार्फत पैशांची मोठ्या प्रमाणात हेराफेरी केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.