झाकीर नाईकच्या मुसक्या आवळणार

0

नवी दिल्ली । वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरु झाकीर नाईक विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात यावी, यासाठी एनआयएने तयारी सुरू केली आहे. यासाठी एनआयएने इंटरपोलला पत्र लिहिले आहे. मनी लाँडरिंग केल्याचा आरोप झाकीर नाईकवर आहे. नाईक संयुक्त अरब अमिरात किंवा सौदी अरेबियात लपून बसल्याचा संशय एनआयएला आहे. नाईक मलेशिया आणि इंडोनेशिया दरम्यान वारंवार ये-जा करत असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडे आहे.

इंटरपोलने झाकीर नाईकच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केल्यास त्याला फरारी घोषित केले जाईल. त्यामुळे जगातील कोणत्याही तपास यंत्रणेला झाकीर नाईकला अटक करण्याची परवानगी असेल. चिथावणीखोर भाषणांमधून समाजात तेढ निर्माण करण्याचा आरोप झाकीर नाईकवर आहे. यासोबतच दहशतवाद्यांना अर्थसहाय्य करण्याचा आणि गेल्या काही वर्षांमध्ये मनी लाँडरिंग करण्याचा आरोपदेखील नाईकवर आहे.

दहा महिन्यांच्या तपासानंतर एनआयएने झाकीर नाईकला अटक करण्यासाठी इंटरपोलची मदत घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या दरम्यानच्या काळात नाईकची संस्था इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन आणि पीस टीव्हीवर सरकारने बंदी घातली आहे. झाकीर त्याच्या संस्था आणि टीव्हीच्या माध्यमातून सामाजिक तेढ निर्माण करत असल्याचे तपास यंत्रणांना आढळून आले आहे.

या प्रकरणात एनआयएला नाईकच्या मालकीच्या काही मालमत्ता आढळून आल्या आहेत. यासोबतच त्याच्याकडून चालवल्या जात असलेल्या काही कंपन्यांची माहितीदेखील एनआयएला मिळाली आहे. या कंपन्यांचे एकूण मूल्य 100 कोटींहून अधिक आहे. एनआयएच्या न्यायालयाने झाकीर नाईकविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. दरम्यान झाकीर नाईक अटक टाळण्याचा प्रयत्न करतो आहे. न्यायालय किंवा तपास यंत्रणांसमोर उपस्थित न राहून नाईक यंत्रणा आणि न्यायालयाला सहकार्य करत नाही, असे एनआयएच्या न्यायालयाने म्हटले आहे. यासोबतच एनआयएच्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचेदेखील न्यायालयाने म्हटले आहे.