ज्येष्ठ समाजसेवक डॉ. द्वारकादासजी लोहिया काळाच्या पडद्याआड

0

अंबाजोगाई : येथील ज्येष्ठ समाजसेवक तथा मानवलोकचे संस्थापक डॉ. द्वारकादास शालीग्रामजी लोहिया (वय ८१) यांचे शुक्रवारी रात्री १०.४५ वा. राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. मागील बारा दिवसांपासुन ते आजारी होते. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी दुपारी १२ वाजता राहत्या घरापासून निघणार असून त्यांच्या पार्थिवावर दुपारी २ वाजता मानवलोक मुख्य कार्यालय परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बाबूजींच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचा दफनविधी करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात प्रा. अभिजीत लोहिया, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, मुलगी प्रा. अरूंधती पाटील, सुना, नातवंडे, जावाई असा परिवार आहे.

राष्ट्रसेवादल, सानेगुरूजी आरोग्य मंडळ, सोशालिस्ट पार्टी आदी व्यापक संघटनात राहून जनसामान्यांच्या दुःखावर फुंकर घालून त्यांचे सत्व जपणारे व संघर्षाची प्रेरणा देणारे व्यक्तीमत्व म्हणून त्यांनी ओळख संपुर्ण महाराष्ट्राला होती. मानवलोकच्या माध्यमातून अंबाजोगाईचे नाव त्यांनी जगाच्या नकाशावर पोहोंचविले. सामान्य माणसांचा आधारवड म्हणून त्यांचा सर्वत्र लौकीक होता. मानवलोक या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी साडेचार दशकं विविध सामाजिक उपक्रम राबविले. मनस्विनी प्रकल्पाच्या माध्यमातून वंचित व परित्यक्त्यां महिलांना आधार दिला. गरिब व निराधारांचाही ते आधार होते.

Copy