ज्येष्ठांच्या मार्गदर्शनात सर्वांच्या सहकार्याने संधीचे सोने करणार

0

नागपूर (प्रतिनिधी)  –माझ्यासारख्या नवख्या माणसावर विश्वास ठेवून मला नेतृत्व करण्याची संधी आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी आणि जनतेने दिली आहे. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनात मतदारसंघाच्या विकासासाठी आटोकाट प्रयत्न करून संधीचे सोने करणार असल्याच्या भावना नवनिर्वाचित आ. चंदूलाल पटेल यांनी व्यक्त केल्या. नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेत शपथ घेतल्यानंतर त्यांनी जनशक्तीची बोलताना भावना व्यक्त केल्या. ते पुढे म्हणाले की, नुकत्याच निवडणुका झाल्या आणि आम्हाला हिवाळी अधिवेशनासाठी यावे लागले. या गोष्टी इतक्या जवळून पहिल्यांदाच पाहत आहे. त्यामुळे सर्व गोष्टी बारकाईने समजून घेणे सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्वांचेच मार्गदर्शन मोलाचे
ज्येष्ठ नेत्यांच्या मदतीमुळेच इथपर्यंत पोहचू शकलो आहे. ना. गिरीशभाऊ महाजन, आ. एकनाथराव खडसे, आ. हरिभाऊ जावळे यांच्यासोबतच आ. सुरेश भोळे, आ.स्मिताताई वाघ यांचे मार्गदर्शन वेळोवेळी मिळत आहे. तसेच सभागृहातील इतरही सदस्यांशी चर्चा होत असून पक्षातील सर्वच सदस्य मार्गदर्शन करत आहे. प्रशासनातील बारीक-सारीक गोष्टींचा अभ्यास करणे सध्या सुरु आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी पूर्ण तयारीनिशी उतरून जनतेचा विश्वास संपादित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

घरच्यांचे सहकार्य
मला इथपर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या संपूर्ण कुटुंबाचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे. सार्वजनिक जीवनात वावरत असताना कुटुंबातील लोकांनी माझ्या टाकलेल्या विश्वासाची ही फलश्रुती असल्याचे त्यांनी सांगितले

हायवेच्या सर्विस रोडचे काम करणार
मतदारसंघात काम करत असताना सहकार्‍यांचे मार्गदर्शन घेऊन मुलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जळगावात रस्ते, खासकरून अत्यंत जीवघेणा असलेला हायवेच्या सर्विस रोडचे काम लवकरच करणार असल्याचे पटेल यांनी सांगितले. त्याचबरोबर नागरिकांना शुद्ध पाणी, स्वच्छता या गोष्टींवर प्रामुख्याने भर देणार असल्याचे पटेल यांनी सांगितले.