‘ज्या रामाने तुम्हाला राजकीय वैभव दिले तो राम वनवासातच’; सामन्यातून सेनेचा सवाल

0

मुंबई – प्रभू श्रीरामाचा जयघोष करत शिवसैनिक अयोध्येत पोहोचले आहेत. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही अयोध्येत जाऊन ‘राम मंदिर कधी उभारणार, तारीख सांगा’ असा अल्टिमेटम मोदी सरकारला दिला. सत्तेसाठी असंख्य वाल्यांना तुम्ही पवित्र केले, पण ज्या रामाने तुम्हाला राजकीय वैभव दिले तो राम वनवासातच आहे. कोर्टाच्या आदेशाशिवाय नोटाबंदी होऊ शकते तर राम मंदिराची उभारणी का होऊ शकत नाही, असा सवाल शिवसेनेचा मुखपत्र सामन्यातून सरकारला करण्यात आला आहे.

निवडणुका आल्या की राम आठवतो, मग अयोध्येत राम मंदिर का बांधत नाहीत ? असा प्रश्न देखील विचारण्यात आला आहे.

अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्दयाला शिवसेनेकडून फुंकर घालण्यात आली आहे. त्यासाठी शिवसैनिकांसह उत्तर प्रदेशात जाऊन उद्धव ठाकरे यांनी शरयू नदीकाठी आरती केली. तर सरकारला आज राम मंदिराची आठवण करुन देण्यासाठी अयोध्येत मोठा कार्यक्रम घेण्यात येत आहे.

राम मंदिर उभारणीसाठी आता आम्हालाही झोपलेल्या कुंभकर्णांना जागे करायचे आहे. उठा, रामाच्या नावाने जी सत्ता मिळवलीत व उबवलीत त्याची चार वर्षे सरून गेली. तुम्ही राजवैभवात लोळत आहात, पण आमचा राम मात्र अयोध्येतच वनवासात आहे. निवडणुका आल्या आहेत म्हणून जागे होऊ नका. राममंदिर उभारणीसाठी जागे व्हा! प्रत्येक हिंदूची आता एकच गर्जना आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर बाण चालवेल आहेत. तसेच, महाराष्ट्राने अयोध्येपर्यंत रामसेतू उभारला आहे. त्या रामसेतूवरूनच आम्ही अयोध्येत आलो असल्याचेही उद्धव ठाकरेंनी सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे.

Copy