ज्ञानरचनावादातून विद्यार्थ्यांसाठी शिक्षण होते सहज आणि आनंददायी

0

भुसावळ । गेल्या काही वर्षापासून शिक्षणक्षेत्रात नवनवीन बदल होवून मुलांना सहज व आनंददायी शिक्षण कसे मिळेल यासाठी विविध संकल्पना राबविल्या जात आहेत. ज्ञानरचनावाद, डिजीटल, कृतीयुक्त अध्यापन पद्धती, कृतीपत्रिका, शैक्षणिक साधनांची निर्मिती याद्वारे दडपण विरहित अध्यापनाचे काम सुरू आहे. अशा प्रकारच्या दडपणविरहित अध्यापनातूनच विद्यार्थ्यांच्या क्षमता व संपादणुकीत वाढ होत असल्याचे प्रतिपादन रावेर तालुक्यातील खिर्डी येथील माजी प्राचार्य बी.आर. पाटील यांनी येथे केले. भुसावळ नगरपरिषदेतर्फे आयोजित शिक्षण परिषदेत दुसर्‍या दिवशी पाटील बोलत होते.

यांनी केले मार्गदर्शन
यावेळी व्यासपीठावर प्रशासन अधिकारी डि.टी. ठाकूर, राज्यस्तरीय तंत्रस्नेही मार्गदर्शक पौर्णिमा राणे, स्पोकन इंग्लिशतज्ञ मार्गदर्शक प्रमोद आठवले, शाळासिद्धी राज्य निर्धारक विजयकुमार मंगलानी उपस्थित होते. कार्यशाळेला मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर यांनी भेट दिली. सकाळच्या सत्रात पौर्णिमा राणे यांनी ज्ञानरचनावाद या विषयावर शिक्षकांशी संवाद साधला.

शब्दातून संवाद साधावा
स्पोकन इंग्लिशद्वारे व्यक्तिमत्व विकास या विषयावर माजी प्राचार्य बी.आर. पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रश्‍न विचारण्याची संधी द्यावी असे सांगितले. स्पोकन इंग्लिश तज्ञ मार्गदर्शक प्रमोद आठवले यांनी एक-एक शब्दातून इंग्रजीत कसा संवाद साधला जातो याची उदाहरणे देवून इंग्रजी भिती मुलांच्या मनातून नष्ट करण्यासाठी सुरूवातीला व्याकरणावर भर न देता फक्त शब्दातून संवाद साधावा. शिक्षक व पालक यांनी इंग्रजीतून संभाषण साधल्यास त्याचा सकारात्मक परिणाम मुलांवर होत असल्याचे आठवले यांनी विविध विनोदी उदाहरणांतून सांगितले.

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा होणार
शेवटच्या सत्रात शाळासिद्धी राज्य निर्धारक विजयकुमार मंगलानी यांनी पीपीटीद्वारे शाळासिद्धी संकल्पनेची माहिती दिली. प्रास्ताविक प्रशासन अधिकारी डि.टी. ठाकूर, सुत्रसंचालन एस.एस. भोई तर आभार मुख्याध्यापिका राजश्री सपकाळे यांनी मानले. द.शि. विद्यालयात सकाळी 8 ते 11 शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन तर गुरुवार 27 रोजी सकाळी म्युनिसिपल हायस्कुलमध्ये निबंध, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. सहभागाचे आवाहन मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, शिक्षण सभापती शैलजा नारखेडे, प्रशासन अधिकारी डि.टी. ठाकूर, मुख्याध्यापिका राजश्री सपकाळे, मुख्याध्यापिका एम.यु. गोल्हाईत यांनी केले आहे.