जैवशास्त्रातील संशोधन देशाच्या प्रगतीसाठी लाभदायक

0

जळगाव । तरुण संशोधकांनी जैवशास्त्रात नवनविन संशोधन करावे, जैवशास्त्रातील संशोधन देशाच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीला हातभार लावणारे असून देशाच्या विकासासाठी ते लाभदायक असल्याचे प्रतिपादन मदुराई कामराज विद्यापीठातील जैविक विज्ञान प्रशाळेतील प्रो.के.मनोहरन यांनी केले. ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जैवशास्त्र प्रशाळेतर्फे आयोजित करंट ट्रेन्ड्स इंन लाईफ सायन्सेस या विषयावर आयोजित चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शुक्रवार 10 मार्च रोजी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. पुढे बोलतांना त्यांनी विज्ञान-तंत्रज्ञानात महिलांचा सहभाग वाढायला हवा. कारण त्यांच्यात क्षमता आणि गुणवत्ता आहेत. संशोधनासाठीचे सर्व गुण महिलांमध्ये आहेत.

अद्ययावत, विश्लेषणात्मक दृष्टीकोन बाळगून संशोधन करावे
तरुण संशोधकांनी जौवशास्त्रातील नवे प्रवाह ओळखून अद्ययावत राहावे व विश्लेषणात्मक दृष्टीकोन बाळगून संशोधन करावे असे नमुद केले. अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील होते. मंचावर देवी होळकर विद्यापीठ इंदौर जैवशास्त्र प्रशाळेचे प्रा.श्रीधर पाटील, प्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी,जैवशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.व्ही.एल.माहेश्वरी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.माहेश्‍वरी यांनी केले. डॉ. एस.आर.भालसिंग यांनी सूत्रसंचालन तर आभार प्रा.ए.जी.इंगळे यांनी केले. प्रा.राजपाल सिंग कश्यप (नागपूर), अरविंद कडू (जळगाव), नुपूर गोयल (नवी दिल्ली), प्रा.एम.सिंगारवेल (वाराणसी), आदींनी चर्चा सत्रात भाग घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.