जैन व्हॅलीत शॉर्टसर्कीटमुळे कारने घेतला पेट

0

जळगाव । शिरसोली रस्त्यावरील जैन व्हॅली येथील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारने शॉर्ट सक्रीटमुळे अचानक पेट घेतल्याची घटना शुक्रवारी रात्री 11 वाजता घडली. सुरक्षा रक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी बॅटरीची वायर काढून आग विझविण्याचा प्रयत्न केला. अर्धा-पाऊण तासानंतर आग विझविण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले. मात्र, या आगीमुळे कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

एमआयडीसी पोलीसात आगीची नोंद
जगदीश सुभाष बारी (वय-28 रा. अडावद ता. चोपडा) हे शिरसोली रस्त्यावर असलेल्या जैन व्हॅली येथे टाटा इंडीका (क्रं.जीजे.06.सीबी.2714) वर ड्रायव्हर म्हणून कामाला आहेत. त्यातच शुक्रवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास जगदीश यांनी कार व्हॅलीतील पार्किंगमध्ये उभी केली होती. मात्र, रात्री अचाकन 11 वाजेच्या सुमारास कारमध्ये शॉर्टसर्कीट झाल्याने कारने पेट घेतला. यावेळी पार्किंग परिसरात असलेल्या सुरक्षा रक्षकांना कारला आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी त्या ठिकाणी धाव घेत अगोदर कारच्या बॅटरीची वायर काढली. त्यानंतर पाणीचा मारा करीत आग विझविण्याचा प्रयत्न केला. अर्धा-पाऊण तासानंतर सुरक्षा रक्षकांना आग विझविण्यात यश आले. मात्र, आगीत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याप्रकरणी जगदीश सुभाष बारी यांनी दिलेल्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.