जैन इरिगेशनचा ‘काँट्रिब्युशन टु इंडियन फ्लोरिकल्चर इंडस्ट्री अवॉर्ड’ने सन्मान

0

जळगाव । ठिबक, सूक्ष्मसिंचन, टिश्युकल्चर, ऑटोमेशन, सौर पंप आदी क्षेत्रासमवेत काळाच्या गरजेनुरुप भारतात सुमारे 48 लाख स्क्वेअर मिटरपेक्षा अधिक क्षेत्रावर हरीतगृहांची उभारणी करून जैन इरिगेशनने यात आघाडी घेतली आहे. हरितगृहाचे तंत्रज्ञान भारतात आणून ते इथल्या वातावरणानुसार विकसित करून शेतकर्‍यांमध्ये रुजविणे आव्हानात्मक होते. हे उच्च कृषि तंत्रज्ञान जैन इरिगेशनने शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवून त्यांना प्रगतीचा नवा मंत्र दिला. कंपनीचे हरितगृह निर्मितीतील हे अभूतपूर्व योगदान लक्षात घेऊन इंडियन सोसायटी ऑफ फ्लोरिकल्चर प्रोफेशनल्स (आय.एस.एफ.पी.) च्या वतीने जैन इरिगेशनला पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित केले. जैन इरिगेशनच्या वतीने ग्रीन हाऊसचे विभाग प्रमुख एस.एन. पाटील यांनी ‘काँट्रिब्युशन टु इंडियन फ्लोरिकल्चर इंडस्ट्री’ हा पुरस्कार स्वीकारला. पुणे येथील हॉटेल शेरेटन येथे आय.एस.एफ.पी. च्या रौप्य महोत्सवी समारंभात हा गौरव करण्यात आला.

जैन इरिगेशनने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले
‘भारतात सर्वप्रथम एरोपोनिक्स तंत्रज्ञान जैन इरिगेशनने आणले व रुजविले. याचबरोबर विदेशात सर्वप्रथम यूके मध्ये व्हर्टिकल फार्मिंग प्रकल्पाची उभारणी करून यात आम्ही आघाडी घेतली. माती विना शेती अर्थात कोको पीटवर 120 एकर क्षेत्रावर शेतीचे अभिनव प्रकल्प भारतात साकारून जैन इरिगेशनने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतल्याचे’ जैन इरिगेशनचे विपणन अध्यक्ष अभय जैन यांनी सांगितले. या पुरस्कारामुळे हरितगृह शेतीतील जैन इरिगेशनचे व हे तंत्रज्ञान अंगीकारणार्‍या शेतकर्‍यांचे श्रम सार्थकी लागल्याची’ प्रतिक्रिया त्यांनी दिली.

उद्योजकांचा सन्मान
शेती, शेतकरी, ग्रीन हाऊस, पॉली हाऊस, ड्रिपर्स, फॉगर्स, लॅटरल्स, पीव्हीसी, ऑटोमेशन अशा कृषी क्षेत्रातील विविध विभागात उल्लेखनिय कार्य करणार्‍या उद्योजकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात आयोजक व सर्वांतर्फे जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी कार्यक्रमात शेतकर्‍यांसह देश-विदेशातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पुरस्कार स्विकारल्यानंतर मान्यवरांनी आपआपले मनोगत व्यक्त करून उपस्थितांना केलेल्या कार्याची माहिती दिली.

फळ-भाज्यांची निर्मिती
यातच हरितगृह शेतीतून सुमारे 4 हजारहून अधिक शेतकर्‍यांना विकासाचा नवा मार्ग मिळाला आहे. औद्योगिक क्षेत्र, विद्यापीठे, महाविद्यालय, संशोधन केंद्रे, वनविभाग आदी क्षेत्रात जैन इरिगेशनने हरित गृहाचे जाळे विणले आहे. जैन इरिगेशनने फुलशेतीला हरितगृहाची जोड दिल्याने गुलाब, जर्बेरा, कार्नेशन, अंथरियम, ऑर्किड, ख्रिसएंथीयम अशा शोभिवंत फुलांचे उत्पादन शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेत आहेत. यासोबतच ग्रीन हाऊसच्या माध्यमातून ढोबळी मिरची, काकडी, चेरी, टोमॅटो, लेट्यूस, स्ट्रॉबेरी, श्रावणघेवडा, वांगे, कोथिंबीर यासारख्या भाज्या व फळांचे भरघोस उत्पादन घेतले जाते. जैन इरिगेशनने नॅशनल हॉर्टीकल्चर मिशन अंतर्गत फळ व भाज्यांची यशस्वी निर्मिती केंद्रेदेखील स्थापन केली आहेत.