जे.टी.चेंबरमधील मोबाईल दुकान फोडले

0

जळगाव। शहरातील शिवतीर्थ मैदानासमोरील जे.टी.चेंबरमधील वायरलेस वर्ल्ड हे मोबाईल दुकान चोरट्यांनी गुरूवारी रात्री 11.57 वाजता फोडून 20 लाख रुपये किंमतीचे 114 मोबाईल लंपास केले. मोबाइल बॅगमध्ये टाकून चोरट्यांनी रात्री 1.32 वाजेता दुकानातून पोबारा केला आहे. शुक्रवारी सकाळी आजुबाजुच्या दुकानदारांना शटर तुटल्याचे दिसल्या नंतर चोरी झाल्याचे समोर आले आहे. जिल्हा पेठ पोलिसांना माहिती देऊनही एक तासानंतर ते घटनास्थळावर पोहोचले. या घटनेतील चोरटा हा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. जिल्हा पेठ पोलिसांचे पथक चोरट्यांच्या शोधार्थ पाठविण्यात आले.

झेरॉक्स दुकान मालकाने दिली चोरी झाल्याची माहिती
जुने जळगाव भागातील श्रीकृष्ण कॉलनीतील राजेंद्र अरूण बारी व पुरूषोत्तम अरूण बारी या दोन्ही भावांच्या मालकीचे शिवतीर्थ मैदानासमोरी जे.टी.चेंबरमधील जी-1 क्रमांकाच्या दुकानात वायरलेस वर्ल्ड हे मोबाईल विक्रीचे दुकान आहे. या दुकानाचे अकरा दिवसांपूर्वी गुढीपाडव्याला उद्घाटन केले. राजेंद्र व पुरूषोत्तम हे दोघं दुकान सांभाळतात तर दुकानात चार कर्मचारी कामाला आहेत. गुरूवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे बारी भावंड दुकान बंद करून घरी निघून गेले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता निलेश झेरॉक्सचे मालकांना बारी यांच्या दुकानाचे शटर तुटलेले दिसले. त्यांनी बारी यांना फोन करून कळविले. बारी यांनी दुकानात जाऊन बघितले. तर त्यांच्या दुकानाचे शटर उचकवून चोरट्यांनी चोरी केल्याचे त्यांना निदर्शनास आले.

सेंटर लॉक तोडले…
वायरलेस वर्ल्ड या दुकानाच्या शटरच्या सेंटर लॉकच्या आजुबाजुला चोरट्यांनी सहा ठिकाणी कटरने कापले. त्यानंतर सेंटर लॉक तोडून गुरूवारी रात्री 11.57 वाजता एका चोरट्याने दुकानात प्रवेश केला. त्याच्या तोंडाला रुमाल बांधलेला होता. त्यानंतर काही वेळ चोरट्याने दुकानात मोबाइल शोधले. मात्र त्याला मोबाइल सापडले नाही. त्यामुळे 12.03 वाजता त्याने कोणाला तरी फोन केला. त्यानंतर चोरट्याने काउंटरच्या खाली असलेले ड्रॉव्हर तोडले. त्यातील नवे मोबाइल चोरट्याने काढण्यास सुरूवात केली. चोरट्याने ड्रॉव्हरमधून ओप्पो, विवो, जीओनी कंपनीचे 20 लाख रुपये किमतीचे 114 मोबाइल बॅगेत भरले तर चार्जर आणि खोके चोरट्याने दुकानातच फेकून दिले. काही महागड्या कंपनीचे मोबाइल दुरूस्तीसाठी आलेले होते. मात्र चोरट्याने त्या मोबाइलला हात लावला नाही. रात्री 1.32 वाजता चोरटा शटरच्या खालून पसार झाला. त्याचा एक साथीदार बाहेर लक्ष ठेऊन होता.

पोलिस घटनास्थळी
बारी यांनी जिल्हा पेठ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस निरीक्षक एकनाथ पाडळे, पीएसआय देवरे, पोलिस कर्मचारी नाना तायडे, राजेंद्र मेढे, अल्ताफ पठाण, अजित पाटील, शेखर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाडळे यांनी दुकानाची पाहणी केली. यावेळी ठसेतज्ञ पथकही पाचरण झाले होते. यानंतर भुसावळ डिवायएसपी निलोत्पल व अपर पोलिस अधीक्षका मोक्षदा पाटील यांनी देखील घटनास्थळी येवून दुकानाची पाहणी करत घटनेची माहिती घेतली. यानंतर चोरट्यांच्या शोधार्थ पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे, अशी माहिती मिळाली आहे.

सीसीटीव्हीत चोरटा कैद
जिल्हा पेठ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता गुरूवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास तोंडोला पांधरा रुमाल बांधलेला चोरटा दुकानात आत शिरतांना दिसून आला आहे. त्यानंतर रात्री 1.30 वाजेच्या पर्यंत त्याने 114 विविध कंपनीचे मोबाईल घेवून दुकानातून बाहेर पळतांना दिसून आला. पोलिसांनी बारी यांच्याकडून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून मोबाईल चोरट्यांच्या शोधार्थ पथक रवाना केले आहे. दरम्यान, या चोरीमुळे व्यावसायिकांमध्ये भितीचे वातारवण परसले आहे.