जेबीजीव्हीएसचे फिरत्या दवाखान्यातून मावळ, खेडमध्ये आरोग्य अभियान

0

मावळ : जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्थेच्या (जेबीजीव्हीएस) फिरत्या दवाखान्यातून गेल्या 10 वर्षात मावळ व खेडच्या 74 गावातील सव्वालाख रुग्णांवर उपचार उपचार करण्यात आले. या उपक्रमांतून गावकर्‍यांना विशेषतः महिलांना आजार व कुपोषणातून मुक्ती मिळाली आहे. जनजागृतीमुळे कार्यक्षेत्रातील अनेक गावांत 100 टक्के प्रसूती रुग्णालयात होतात. योग्य उपचार व मार्गदर्शनामुळे अकाली मृत्यू टाळता आले आहेत. पूर्वीची निरामय जीवनशैली झपाट्याने नष्ट होत असताना पुन्हा एकदा येथील गावकर्‍यांमध्ये आरोग्य विषयी जागृती वाढू लागली आहे. ग्रामीणांच्या आरोग्यसेवेसोबतच प्रगतीला हातभार लावण्याचे, आणि व्यक्तिमत्त्व, ओळख व आत्मविश्वास सुद्धा वृद्धिंगत करण्यासाठी संस्थेने पुढाकार घेतला आहे.

2006 पासून उपक्रम
जून 2006 पासून या फिरत्या दवाखान्याने पुण्याच्या मावळ व खेड तालुक्यात 74 गावांतील रुग्णांवर उपचार केले आहेत. सध्या खेड मध्ये हा दवाखाना जिथे या सुविधेची सर्वात जास्त गरज आहे अशा ठिकाणी फिरत आहे. सदर दवाखान्यासोबत एक डॉक्टर व एक परिचारिका आणि संस्थेचा चालक, मदतनीस असतात. डॉ. राजश्री बिराजदार व मनीषा कांबळे यांची फिरत्या दवाखान्यावर नेमणूक करण्यात आली आहे. गेल्या 10 वर्षांत एक लाख 25 हजार रुग्णांवर अशाप्रकारे उपचार केले आहेत. कै. डॉ. बानू कोयाजी यांच्या 1970 च्या दशकातील वढू प्रकल्पातून प्रेरणा घेऊन 1990 मध्ये जेबीजीव्हीएसने जागतिक बँकेच्या एका प्रकल्पांतर्गत आरोग्य सेविकांना प्रशिक्षित केले. पुण्याच्या केइएम रुग्णालयाचे तज्ज्ञ, गडचिरोलीतील सर्च संस्था व बजाज ऑटोचे सामान्य व्यवस्थापक-औद्योगिक आरोग्य डॉ. एस. एम. अकोलकर यांचे मार्गदर्शन सदर आरोग्य सेविकांना प्रशिक्षण मिळाले. सेवाधाम ट्रस्ट सारख्या संस्थांच्या सोबतही त्यांनी काम केले.

फिरत्या दवाखान्याचे कार्य
रोज सकाळी फिरता दवाखाना जेबीजीव्हीएसच्या आकुर्डीतील (पुणे) मुख्यालयातून बाहेर पडतो. लाभार्थी गावांत पोहोचण्यापूर्वी फिरता दवाखाना हजर असतो. संपूर्ण आठवड्याचे वेळापत्रक ठरवण्यात येत असून त्यामुळे सर्व संबंधित गावांत वेळोवेळी सुविधा पुरवली जाऊ शकते. महिला व मुलांसह सर्व गावकर्‍यांना आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी दवाखान्यात प्रथमोपचार पेटी, मूलभूत औषधे आणि रक्तदाब, नाडी व डोळे तपासणीची उपकरणे उपलब्ध असतात. रुग्णांकडून 5 किंवा 10 असे माफक शुल्क आकारले जातात. गंभीर परिस्थिती असलेले रुग्ण व प्रसूत होऊ घातलेल्या महिला यांना त्वरित नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात हलवण्याची शिफारस केली जाते. रोग प्रतिबंध व स्वच्छता यांबद्दल जागृती केली जाते.