जेएनयूप्रकरण: आईशी घोषसह १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

0

नवी दिल्ली: सध्या संपूर्ण देशात जेएनयूतील हल्ल्याच्या घटनेवरून तणाव आहे. विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आईशी घोषसह १९ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले आहे. विद्यापीठातील सर्व्हर रुमची तोडफोड आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याच्या आरोपात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. जेएनयू रविवारी झालेल्या हल्ल्यात आईशी घोषवर प्राणघातक हल्ला झाला होता.

जेएनयूत रविवारी काहीजणांनी जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थ्यांवर हल्ला केला होता. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनावर अनेकांनी टीका केली होती. त्याआधी फी वाढ विरोधी आंदोलन जेएनयू विद्यार्थी संघटनेने पुकारले होते. या आंदोलनाचा भाग म्हणून सबमिशन्स, परिक्षांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनानंतर चार जानेवारी विद्यापीठाच्या सर्व्हर रुमची तोडफोड करण्यात आली. ही तोडफोड जेएनयू विद्यार्थी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप होता. पाच जानेवारी रोजी विद्यापीठ प्रशासनाने ह्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. अखेर आज पोलिसांनी जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशी घोषसह १९ जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

आईशी घोषसह इतरही विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. आईशी घोषच्या डोक्यावर रॉडने हल्ला केला. यात ती रक्तबंबाळ झाली होती. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. ठिकठिकाणी विद्यार्थी-युवकांनी आंदोलने सुरू केली.

Copy