जून महिन्यात सवलतीच्या दराने धान्याचे वाटप

नंदुरबार। राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना आणि शेतकरी योजनेअंतर्गत समाविष्ट न झालेल्या जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारकांना प्रतिव्यक्ती 1 किलो गहू व 1 किलो तांदूळ याप्रमाणे 2 किलो धान्य जून महिन्यात सवलतीच्या दराने वितरीत करण्यात येणार आहे. जिल्ह्यात 62 हजार 766  एपीएल शिधापत्रिकाधारक आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दराने प्रतिव्यक्ती 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ याप्रमाणे 5 किलो अन्नधान्याचा लाभ देण्यात आला आहे. जिल्ह्यात 160 मे.टन तांदूळ आणि 343 मे.टन गहू अद्यापही शिल्लक आहे. असेे शिल्लक धान्य केशरी शिधापत्रिकाधारक गरजू व्यक्तींना वितरीत करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. प्रथम मागणी करणार्‍यास देणे या तत्वानुसार गहू 8 रुपये प्रतिकिलो आणि तांदूळ 12 रुपये प्रतिकिलो दराने वितरीत करण्यात येईल.  जिल्ह्यातील ज्या गोदामामध्ये अन्नधान्य साठवणूक केले आहे. त्याच तालुक्यात आणि ज्या रास्त भाव दुकानात अन्नधान्य शिल्लक आहे. त्याच दुकानात अन्नधान्याचे वाटप करण्यात येणार आहे.