जुन्या नोटा बाळगाल तर गोत्यात याल!

0

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आज जुन्या हजार आणि पाचशेच्या नोटा बाळगल्यास दंड आणि कारावासाची तरतूद असणारा वटहुकुम जारी केला. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी आता 30 डिसेंबरनंतर पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा जवळ बाळगणे कायदेशीर गुन्हा ठरणार आहे. 10 पेक्षा जास्त जुन्या नोटा सापडल्यास दंड आकारण्यात येणार असल्याचा निर्णय केंद्रीय कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला. नियमांचा भंग केल्यास आर्थिक दंड भरावा लागणार असून 4 वर्षे कारावासाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे जुन्या नोटा बाळगणे आता चांगलेच महाग पडणार आहे. जुन्या नोटा बँकेत भरण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत मुभा देण्यात आली आहे. सरकारने याआधी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे चलनातून बाद झालेल्या नोटा रिझर्व्ह बँकेत भरण्याची परवानगी आहे, मात्र त्यासाठी योग्य कारण द्यावे लागणार असून अध्यादेशात याची नोंद करण्यात आली आहे. केंद्र सरकारने 8 नोव्हेंबरला काळा पैसा, भ्रष्टाचार आणि बोगस नोटांच्या काळ्या धंद्यासह दहशतवाद्यांना होणार्‍या पैशांचा पुरवठा रोखता यावा, यासाठी नोटाबंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. यानंतर तब्बल 60 पेक्षा जास्त वेळेस विविध निर्णय घेण्यात आल्याने विरोधकांनी सरकारवर टिकेची झोड उठवली होती. या पार्श्‍वभूमिवर आजचा वटहुकुम हा केंद्राचा नोटाबंदीबाबत शेवटचा नियम ठरणार का? याबाबत सर्वसामान्यांना उत्सुकता लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सकाळी केंद्रीय कॅबिनेटच्या बैठक झाली. त्यात हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. जुन्या चलनातील 15 लाख 4 कोटी रकमेपैकी एकूण 14 लाख कोटी आतापर्यंत बँकेत जमा किंवा बदली करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (आरबीआय) जुन्या नोटा जमा करण्याच्या 31 मार्च 2017 ही मुदत देण्यात आली आहे. मुदतीत कोणताही बदल होणार नसल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

अंगठ्याच्या ठशावरून ‘डिजीटल पेमेंट’
दरम्यान, कॅशलेस आर्थिक व्यवहारांना गती देण्यासाठी केंद्र सरकारने आज आधार पेमेंट अ‍ॅप सुरु केले आहे. या मोबाईल अ‍ॅपमुळे फक्त आधार कार्ड नंबरच्या सहाय्याने कुणीही पेमेंट करु शकणार आहोत. यासाठी फक्त आपल्याला अंगठ्याचा ठसा द्यावा लागणार आहे. विशेष म्हणजे हे अ‍ॅप वापरण्यासाठी आपल्या खिशात स्मार्टफोन असण्याची गरज नाही. पण हे अ‍ॅप वापरण्यासाठी आपलं बँक खातं आधार कार्डशी संलग्न असलं पाहिजे. या अ‍ॅपला युआयडी, आयडीएफसी आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने तयार केलं आहे. हे अ‍ॅप दुकानदार आणि ग्राहकाला आपल्या स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करावं लागणार आहे. गुगल प्ले स्टोअरवर हे अ‍ॅप उपलब्ध असणार आहे. अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये आपला आधार क्रमांक आणि बँकेचं नाव टाकावं लागेल. यानंतर आपल्या अंगठ्याचा ठसाही त्यामध्ये द्यावा लागेल, त्यानंतर आपला अंगठ्याचा ठसा आपली ओळख असेल. आणि त्याद्वारे पेमेंट करु शकतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारचा सर्व्हिस चार्ज लागणार नाही.

नोटाबंदीचा ‘फ्लॉप शो’?
नोटाबंदीच्या 50 दिवसात बँकांमध्ये अंदाजापेक्षा अधिक जुन्या नोटा जमा झाल्याने काळ्या पैशाला अंकुश लावण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याचा आरोप आता करण्यात येत आहे. बनावट नोटांचा वापर आणि काळा पैसा रोखण्यासाठी केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयानुसार पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. एकूण 15.4 लाख कोटी मुल्यांच्या या नोटा होत्या. या नोटा बंद केल्याने किमान तीन ते चार लाख कोटी रुपये काळा पैसा आपोआप व्यवस्थेबाहेर फेकला जाईल, असा केंद्र सरकारला अपेक्षित होते. मात्र विहीत 50 दिवसात 15.4 लाख कोटी रुपयांपैकी एकूण 14 लाख कोटी रुपये बँकेत जमा झाले आहेत. म्हणजे केवळ दीड लाख कोटी रुपयेच बँकेत येऊ शकले नाही. यामुळे हा निर्णय फसला असल्याची टीका आता करण्यात येत आहे. या सर्व प्रकरणात मात्र देशातील कोट्यवधी जनतेला झालेला त्रास हा तापदायक असल्याचेही दिसून
आले आहे.

अशा आहेत तरतुदी
बँकांमध्ये जुन्या नोटा जमा करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. नोटाबंदीच्या 50 दिवसांत आतापर्यंत बँकांमध्ये 90 टक्के म्हणजे 14 लाख कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत. उर्वरित 10 टक्के रक्कम अद्याप जमा होऊ शकलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत जुन्या नोटा बाळगण्यासंदर्भात अध्यादेश जारी करण्यात आला आहे. त्यानुसार 10 पेक्षा अधिक नोटा जवळ बाळगल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. या अध्यादेशानुसार 30 डिसेंबरनंतर 10 पेक्षा अधिक जुन्या नोटा बाळगता येणार नाहीत. बाद केलेल्या नोटा 30 डिसेंबरनंतर जवळ बाळगल्यास जबर दंड बसणार आहे. तसा अध्यादेश केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जारी करण्यात आला. जुन्या नोटा जमा करण्यास अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. ते अद्याप बँकेत जमा झालेले नाहीत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जुन्या नोटा बाळगण्यासंदर्भात जारी केलेल्या अध्यादेशानुसार, आता उर्वरित जुन्या नोटा बँक क्षेत्रात परत येतील असे मानले जात आहे. दरम्यान, 1 जानेवारी ते 31 मार्चपर्यंत आरबीआयच्या ठराविकच कार्यालयांमध्ये जुन्या नोटा जमा करता येणार आहेत. एखादे संशोधन किंवा मुद्राशास्त्रसाठी या नोटा बाळगण्याची परवानगी मिळू शकते. मात्र त्यासाठी योग्य कारण देणं गरजेचं असणार आहे.

आरोप-प्रत्यारोप सुरूच
नोटाबंदीवरून सुरू असणारे आरोप-प्रत्यारोप आजही करण्यात आले. देशातील उद्योगपती 50 कुटुंबासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा यज्ञ केला. या यज्ञात त्यांनी गरिबांचा बळी दिला. या निर्णयापासून 50 दिवसांत देशात काहीही बदल झालेला नाही, अशी जोरदार टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजप नेत्यांनी राहुल यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर मृत्यू झालेल्या नागरिकांबाबत राहुल यांच्याकडून राजकारण करण्यात येत असून, ते जनतेची दिशाभूल करत आहेत, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय सचिव श्रीकांत शर्मा यांनी केली आहे. शर्मा म्हणाले, की राहुल चोरांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. पंतप्रधानांवर आरोप करण्याचे काम राहुल गांधी करत आहेत. या देशाची तिजोरी कशी लुटली गेली, याचे उत्तर जनता मागत असल्याचे ते म्हणाले.