जुन्या नोटा कुरिअरने विदेशात; नव्या नोटांसाठी युक्ती

0

नवी दिल्ली । पाचशे व हजारच्या जुन्या नोटा कुरिअरने विदेशात पाठवून नंतर अनिवासी भारतीयांमार्फत त्या देशात बदलून घेण्याची नवी युक्ती काही जणांनी अवलंबली आहे. सीमा शुल्क विभागाच्या निदर्शनास असे प्रकार आले असून, विभागाकडून याप्रकरणी कारवाई सुरू झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सरकारने पाचशे व हजारच्या नोटा बंद केल्या होत्या. या नोटा बदलून घेण्यासाठी अनिवासी भारतीयांना 30 जूनपर्यंत मुदत आहे. देशातील नागरिकांसाठी ही मुदत गेल्या वर्षी 30 डिसेंबरपर्यंत होती. आता या नोटा बदलण्यासाठी काही नागरिकांनी नवी शक्कल काढली आहे. जुन्या नोटा कुरिअरने विदेशात पाठवायच्या आणि नंतर अनिवासी भारतीयांमार्फत त्या देशात बदलून घ्यायच्या.

सीमा शुल्कचे प्रमाणपत्र बंधनकारक
नागरिक कुरिअरने पुस्तकांच्या नावाखाली विदेशात नोटा पाठवत आहेत. सीमा शुल्क विभागाने अशाप्रकारे विदेशात पाठविण्यात येणार्‍या 1 लाख रुपयांपेक्षा अधिक नोटा जप्त केल्या आहेत. याप्रकरणी गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. दोन प्रकरणांमध्ये पंजाबमधून ऑस्ट्रेलियात कुरिअरने पुस्तकाच्या नावाखाली जुन्या नोटा पाठविण्यात आल्या होत्या. सीमा शुल्क विभागाकडून विदेशात जाणार्‍या पार्सलवर नजर ठेवण्यात येते. त्यांच्या निदर्शनास ही बाब आली. याचप्रकारे कोरिया आणि संयुक्त अरब अमिरातीलाही कुरिअरने नोटा पाठविण्यात आल्याचे समोर आले आहे. भारतात जुन्या नोटा बदलण्यासाठी येणार्‍या अनिवासी भारतीयांना विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांसमोर जुन्या नोटांचा तपशील देणे बंधनकारक आहे. या अधिकार्‍यांनी दिलेले प्रमाणपत्र रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयात दाखविल्यानंतर त्यांना जुन्या नोटा बदलून मिळत आहेत. सध्या रिझर्व्ह बँकेच्या मुंबई, दिल्ली, कोलकता, चेन्नई आणि नागपूरमधील कार्यालयात 30 जूनपर्यंत अनिवासी भारतीयांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे.