जुनोनेत विषबाधेने 35 मेंढ्या दगावल्या : अन्य 35 मेंढ्यांनाही लागण

0

बोदवड : तालुक्यातील जुनोने येथील रहिवासी नारायण जगदेव येळे व त्यांचे सहकारी हे जुनोने शिवारात दिनांक 18 रोजी मानसिंग पाटील यांच्या शेतात 350 मेंढ्या चारत असताना मेंढ्यांनी कोंब आलेल्या मक्याची कणसे व कोंब खाल्ल्याने मंगळवारी सुमार 35 मेंढ्या दगावल्याने सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले तर 35 ते 40 मेंढ्यांना विषबाधेची लागण झाल्याने नुकसानीचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

विषबाधेने मेंढ्याचा मृत्यू

पंचायत समितीचे विस्तार अधिकारी डॉ.नीलकांत पाचपांडे म्हणाले की, मेंढ्यांनी मक्याची खराब कणसे व कोंब खाल्ल्याने मेंढ्यांना ओक्झिलेट नावाची विषबाधा झाल्याने मेंढ्या फुगून मरण पावत आहेत व हा आजार गंभीर असल्याने या आजारात जनावरांना वाचविणे अवघड आहे. विघबाधेची लागण झालेल्या मेंढ्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत व लागण झालेल्या मेंढ्यांवर औषधोपचार सुरू असल्याचे ते म्हणाले. खराब झालेल्या मक्याची कणसे व कोंबे जनावरांना खाऊ देऊ नयेत नवीन चारा उपलब्ध नसल्याने जुन्या चार्‍यावर चुन्याची प्रक्रिया करून तो खाऊ घालावा जेणेकरून विषबाधा होऊन पशुधनाचे नुकसान होणार नाही, असेही डॉ.पाचपांडे म्हणाले. मृत मेंढ्यांचे शवविच्छेदन करण्यात येणार असून शेतकर्‍यांनी व मेंढपाळांनी जनावरांची काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले.

शासनाने भरपाई द्यावी

350 मेंढ्यांपैकी 35 मेढ्या दगावल्या आहेत व सुमारे 35 मेंढ्यांना विषबाधेची लागण झालेली आहे त्यामुळे हा आकडा वाढू शकतो. तीन लाखांचे नुकसान झालेले आहे. दुष्काळी परीस्थितीत नुकसान झाल्याने नुकसानीची त्वरीत सरकारी मदत मिळावी, अशी अपेक्षा मेंढपाळ जगदेव येळे (जुनोने) यांनी व्यक्त केली.

Copy