‘जुनेद’ने प्रामाणिकपणे 40 हजार रूपये केले परत

कपडे इस्त्री करतांना ग्राहकाच्या ‘खिशात’ सापडली रक्कम

 

शिंदखेडा। कपडे इस्त्री करणार्‍या युवकाने ग्राहकाच्या खिशात राहिलेली रोख रक्कम 40 हजार रुपये प्रामाणिकपणे परत केली. या युवकाचे नाव जुनेद समद शेख (धोबी) असे आहे. शेख (धोबी) परिवाराचा शिंदखेडा शहरात गेल्या 60 वर्षापासून इस्त्री करण्याचा व्यवसाय आहे. जुनेदचे आजोबा अहमदभाई शेख यांनी हा व्यवसाय सुरू केला होता. येथील गांधी चौकात त्यांचा व्यवसाय सुरुवात झाला होता. अहमदभाई शेख यांच्यानंतर त्यांचे पुत्र हरून व समद शेख यांनी व्यवसायात हातभार लावला. समद यांनी येथील पंचायत समितीजवळ दुकान थाटले. आपला मुलगा जुनेद यासोबत हा व्यवसाय सुरू ठेवला.

इस्त्री करताना आढळली रक्कम
वरुळ रोडलगत पंचायत समितीजवळ समद शेख यांचे कपडे इस्त्री करण्याचे लहान दुकान आहे. गेल्या बारा वर्षांपासून ते येथे व्यवसाय करत आहे. शुक्रवारी सकाळी कॉलनी परिसरातील रहिवासी पंचायत समितीत नोकरी करणारे राजेंद्र पाटील हे कपडे इस्त्री करण्यासाठी टाकून गेले. समद शेख यांचा मुलगा जुनेद शेख (धोबी) याने इस्त्री करण्यासाठी कपडे काढले. तेव्हा त्याला पाटील यांच्या पॅन्टच्या खिशात 40 हजार रूपये आढळून आले. त्याने लगेच संपर्क करत राजेंद्र पाटील यांना आपले हरविलेले पैसे किती याची विचारणा केली. आपले हरविले रक्कम कोठेतरी पडली असल्याच्या विवंचनेत असलेले पाटील यांच्या लक्षात आले की, आपल्या पॅन्टच्या खिशात ही रक्कम राहिली. खिशात 40 हजार रुपये होते, असे जुनेद याला सांगितले.

सोशल मीडियावर कौतुक
खातर जमा होताच जुनेद याने कॉलनी परिसरातील रहिवाशांच्या समक्ष पाटील यांना 40 हजाराची रक्कम परत केली. पाटील यांनी जुनेदने दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल गुलाबपुष्प व श्रीफळ देऊन त्याचा सत्कार केला. तसेच हजार रुपये बक्षीस दिले. गेल्या 60 वर्षांपासून प्रामाणिकपणे व्यवसाय करत असलेल्या शेख परिवारास जुनेदच्या प्रामाणिकपणाची कौतुकाची थाप मिळत आहे. जुनेदच्या प्रामाणिकपणाचे सोशल मीडियावर तसेच सर्वत्र कौतुक होत आहे.