जुनी सांगवीत दहा वाहनांची तोडफोड

0

सांगवी : दहशत माजविण्याच्या उद्देशाने सात ते आठ जणांच्या टोळक्याने जुनी सांगवी परिसरात रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनांची तोडफोड केली. ही घटना शनिवार (दि. 1) रोजी रात्री पावणे दहा ते अकराच्या सुमारास जुनी सांगवीतील वेताळ महाराज सोसायटीजवळ घडली. या घटनेत टोळक्याने तीन मोटार कार तसेच सात दुचाकींची तोडफोड करत नुकसान केले आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यातील एक जण अल्पवयीन आहे. या घटनेनंतर उर्वरित आरोपी पसार झाले असून, पोलीस त्यांच्या मागावर आहेत. फरार असलेल्या आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती सांगवी पोलिसांनी दिली.

दोघे संशयित तत्काळ ताब्यात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी अक्षय उर्फ जोग्या जाधव, अक्षय म्हसे, ओंकार काटे, शुभम मानकर, अक्षय माकर यांच्यासह अन्य दोन ते तीन जणांनी वाहनांची तोडफोड केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवून संशयित आरोपी अक्षय माकर व त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या दोघांचे अन्य साथीदार फरार आहेत. पोलिसांकडून दोघांची कसून चौकशी सुरू असून, त्यांच्या फरार असलेल्या साथीदारांची माहिती काढली जात आहे. याप्रकरणी प्रदीप रुद्रप्पा रोनक (वय 32, रा. आनंदनगर, जुनी सांगवी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील संशयित आरोपींविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींकडून दोघांना मारहाण
फिर्यादी प्रदीप रोनक हे आपल्या कुटुंबीयांसमवेत त्यांच्या सासर्‍यांना औंध येथे सोडण्यासाठी जात होते. त्यावेळी गुन्हा दाखल झालेल्या आरोपी तीन ते चार दुचाकींवरून हातात कोयता आणि लाकडी दांडुके घेऊन वेताळ महाराज सोसायटीच्या परिसरात आले. आरोपींनी प्रदीप यांना शिवीगाळ करत त्यांच्या इंडिका गाडीवर लाकडी दांडुके मारून गाडीचे नुकसान केले. हा प्रकार पाहून आरोपींना मज्जाव करण्यासाठी आलेल्या रवी माने यांनादेखील टोळक्याने लाकडी दांडुक्याने मारहाण केली. तसेच परिसरात लावलेल्या इतर गाड्यांवरही कोयते, लाकडी दांडुके मारून गाड्यांचे नुकसान केले. त्यानंतर संशयित आरोपी ओंकार काटे याने प्रदीप रोनक यांच्या गाडीची पुन्हा तोडफोड केली. तोडफोड करताना मज्जाव केलेल्या रोनक यांना काटे याने मारहाण केली.

या वाहनांचे झाले नुकसान
या टोळक्याने वेताळ महाराज सोसायटीतील एसेंन्ट (एमएच 14 एएम 9855), प्रशांत ढमाले यांची नॅनो (एमएच 14 सीके 6437), रवी माने यांची इंडिका (एमएच 14 जीडी 0231), रतन माने यांची टीव्हीएस फेरो (केए 03 ईएम 9455), राजू मोरे यांची अ‍ॅक्टिव्हा (एमएच 14 एफआर 9123) आणि स्प्लेंडर (एमएच 14 डीई 1233), दीपक नेमाडे यांची टीव्हीएस ज्युपिटर (एमएच 14 एफके 7498), विद्यासागर गुरव यांची सीबीझेड (एमएच 12 ईके 8258), सचिन कंठक यांची पॅशन प्रो (एमएच 12 एचई 8134), सीडी 100 (एमएफझेड 2518) या वाहनांची तोडफोड केली. सांगवी पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.