जुगार अड्ड्यावर थाळनेर पोलिसांची धडक कारवाई

0

पावणे दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
शिरपूर: कोरोना सदृश्य परिस्थितीत लॉकडाऊन असतांना नागरिक नियमांना धाब्यावर ठेवून अवैध धंदे करीत आहे. त्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडत थाळनेर पोलिसांनी धडक छापा टाकत कारवाईचा बडगा उगारला आहे. सोमवारी, 27 रोजी सायंकाळी 6.15 वाजेच्या सुमारास सावळदे व घोडसगाव येथे टाकलेल्या छाप्यात 1 लाख 84 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सविस्तर असे, साळवदे येथे जुगार खेळत असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सायंकाळी 6.15 वाजता सावळदे येथे गावालगत असलेल्या गावठाण हद्दीत छापा टाकला. त्यात संशयित संदेश पांढुरंग राजपूत, राकेश अंबालाल राजपूत, जवान देवनाथ राजपूत, अरुण महादू पाटील, ललित प्रकाशसिंग राजपूत (सर्व रा.अहिल्यापूर) आणि ज्ञानेश्वर हिरामण कोळी (देवभाने), अकिब इक्बाल पठाण (शिंदखेडा), दिलीप देवसिंग राजपूत (पिंप्री), जितेंद्र लोटन कोळी, मुकेश प्रल्हाद कोळी (सावळदे), राजेश नेनीचंद जैन (शिरपूर) यांना जुगार खेळतांना पकडण्यात आले. या संशयितांकडून मोबाईलसह मोटारसायकल असा 1 लाख 330 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

दुसर्‍या घटनेत घोडसगाव शिवारात प्रल्हाद बुधा कोळी यांच्या केळीच्या शेतात बांधाजवळील निंबाच्या झाडाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर थाळनेर पोलिसांनी केलेल्या कारवाईत शांताराम सिताराम पाटील, गुलाब गंभीर कोळी, जगन्नाथ दामू कोळी, भरत युवराज कोळी, आत्माराम लखा मोरे, दादाभाऊ सिताराम मोरे, अमोल राजेंद्र पाटील, गयबु नामदेव पाटील, जयदेव साहेबराव भिल, राहुल हिम्मत पाटील (सर्व रा.घोडसगाव) यांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 25 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी थाळनेर पोलीस ठाण्यात कोविड 19 प्रतिबंधक कायदा 188 व विविध कायद्यानव्ये गुन्हा दाखल केला आहे.

Copy