जुगारावर छापा टाकून तडजोडीच्या प्रयत्नातील पोलिसांची झाडाझडती

0

अपर पोलीस अधीक्षकांनी चौकशी करुन मागविला खुलासा : जुगार खेळणार्‍यांपैकी एकाने वरिष्ठांना फोनवरुन कळविला प्रकार

जळगाव– शहरातील हरिविठ्ठल नगर स्टॉपवर पत्र्याच्या शेडमध्ये जुगाराचा डाव रविवारी रामानंदनगर पोलिसांनी उधळून लावला. यानंतर कारवाईनंतर जुगार खेळणार्‍यांसोबत पोलीस कर्मचार्‍यांनी तडजोडीचा प्रयत्न केला. या तडजोडीच्या प्रकाराबाबत जुगार खेळणार्‍यांमधील एकाने अपर पोलीस अधीक्षकांना फोनवरुन कळविला. त्याची गंभीर दखल घेत अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी संबंधित कर्मचार्‍यांची चांगलीच झाडाझडती घेतली असून पाचही पोलीस कर्मचार्‍यांला खुलासा मागविला असल्याची माहिती मिळाली आहे. अपर पोलीस अधीक्षकांच्या या कार्यवाहीने एकच खळबळ उडाली असून पोलीस दलात याबाबत एकच चर्चा सुरु आहे.

पाच जण ताब्यात, 21 हजारांचा मुद्देमाल जप्त

हरिविठ्ठल नगर स्टॉपवर एका पत्र्याच्या शेडमध्ये पाच जुगाराचा खेळ खेळत असल्याची माहिती रामानंदनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार कर्मचारी उमेश पवार, विनोद सोनवणे, अल्ताफ पठाण, निलेश दंडगव्हाण, चंद्रकांत पाटील या कर्मचार्‍यांचे पथकाने माहितीनुसार रविवारी दुपारी 3.45 वाजेच्या घटनास्थळ गाठून जुगार अड्डयावर छापा टाकला. कारवाईत पोलिसांनी 3600 रुपये रोख, 3 मोबाईल व एक दुचाकी असा 21 हजार 150 रुपयांचा माल जप्त केला. तसेच जुगार खेळणार्‍या विजय अशोक मोरे, अकबर पटेल, विकास शिवराम दुबळकर, गणेश पांडुरंग कापडे, गणेश राजू वाघ सर्व रा. हरिविठ्ठल नगर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ताब्यात घेण्यात आले.

कर्मचार्‍यांनी पैसे मागताच वरिष्ठांना फोन

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कारवाईत कर्मचार्‍यांनी संबंधित जुगार खेळणार्‍यांसोबत तडतोड करण्याचा प्रयत्न केला. तडतोड म्हणून काही पैसेही मागतिले. पैसे मागताच, जुगार खेळणार्‍या पाच जणांपैकी एकाने थेट अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांना मोबाईलवरुन फोन केला व सदरचा प्रकार कळविला. तोपर्यत संशयित तसेच मुद्देमाल जप्त करत पोलीस ठाण्यात पोहचले होते.

पाचही कर्मचार्‍यांकडून मागविला खुलासा

जुगारावर कारवाई करुन तडजोडीच्या प्रकाराची गंभीर दखल घेत भाग्यश्री नवटके यांनी तत्काळ रामानंदनगर पोलीस ठाणे गाठले. याठिकाणी स्वतंत्रणपणे पाचही कर्मचार्‍यांची झाडाझडती केली. रात्री उशीरापर्यंत चौकशीत पाचही कर्मचार्‍यांनी पैसे मागितले नसल्याचेच सांगत होते. यानंतर नवटके यांनी रामानंदनगर पोलीस निरिक्षकांना सुचना दिल्या. तसेच संबंधित पाचही कर्मचार्‍यांचा प्रकाराबाबत खुलासा मागविला आहे. खुलासा आल्यावर पुढील कार्यवाही करणार असल्याचे भाग्यश्री नवटके यांनी जनशक्तिशी बोलतांना सांगितले.

Copy