जीवनात दु:खांना कारणीभूत असलेल्या गाठी भगवंत सोडवतो

0

मुक्ताईनगर : प्रत्येक जीवाची सुखाकडेच ओढ असते. कोणालाच दु:ख आवडत नाही. कारण सुख हे जीवाचे स्वरूप आहे आणि दु:ख आगंतुक आहे. जोपर्यंत शरीराचा मीपणा दूर होत नाही तोपर्यंत दु:ख दूर होणार नाही. शरीराला आपले मानणे हेच दु:खाचे मूळ आहे. शरीराचा संबंध म्हणजे गाठ. अशा दु:खांना कारणीभूत असलेल्या गाठी भगवंत सोडवतो, असे प्रतिपादन श्री क्षेत्र आळंदी येथील हभप गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत यांनी श्रीक्षेत्र मेहूण तापीतीर येथे केले. मुक्ताईनगर तालुक्यातील श्री क्षेत्र मेहूण तापीतीर येथे सुरू असलेल्या श्रीसंत सोपानकाका समाधी सोहळा समारोपात आयोजित काल्याच्या कीर्तनात ते बोलत होते.

किर्तनातून दिला भक्तीचा संदेश
18 डिसेंबरपासून सुरू झालेल्या श्री संत सोपानकाका समाधी सोहळ्यात सकाळी व रात्री कीर्तनाचे कार्यक्रम पार पडले. त्यात रवींद्र महाराज, बाळासाहेब महाराज, रामकृष्ण महाराज, उमेश महाराज, अंकुश महाराज, भास्करगिरी महाराज, गोपाळ महाराज, चैतन्य महाराज, शिवाजी महाराज, डॉ. वेणूनाद महाराज, गोविंद महाराज, प्रकाश महाराज, ज्ञानेश्वर महाराज, प्रकाश महाराज, भरत महाराज, रामभाऊ महाराज यांची कीर्तने झाली.

सात दिवसात 17 कीर्तनाचा लाभ
समारोपाप्रसंगी श्री क्षेत्र आळंदी येथील हभप गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या सोडियेल्या गाठी या अभंगावर काल्याचे कीर्तन केले. मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला संत सोपानकाका समाधी सोहळा झाला. सप्ताहातील सर्व 17 कीर्तनांचा लाभ हजारो भाविकांनी घेतला.

151 जोडप्यांचा यज्ञ
मानवी जीवनात सुख, शांती, समृद्धी व लक्ष्मी टिकवून ठेवण्यासाठी तापीतीरी श्री महालक्ष्मी कुबेर महायज्ञ होमहवन पूजेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पती-पत्नी भाविक जोडप्यांनी सहभाग घेवून यज्ञ केला. हभप मनोहर महाराज देव अंतुर्ली, सतीश ठाकुर द्वारकर जैनाबाद व त्यांचे सहकारी ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंत्रविधीत श्री महालक्ष्मी कुबेर महायज्ञ होमहवन पार पडले. सप्ताहात दररोज पार पडलेल्या महायज्ञ पूजेत सात दिवसात 151 जोडप्यांनी सहभाग घेवून यज्ञादी होमहवन केले.