जीवनात खेळाडूवृत्ती अंगीकारा

0

भुसावळ । भुसावळमधील विद्यार्थ्यांमध्ये खूप प्रतिभा आहे. महाराष्ट्रातील अनेक छोट्या छोट्या शहारांमध्ये क्रीडा संस्कृतीच वाढत चाललेली आहे. विद्यार्थ्यांनी क्रीडा संस्कृती अंगीकारली, लहानपणापासून वेगवेगळे खेळ खेळलात, तर चांगले नागरिकही होऊ शकता. कारण खेळाडू हरले तरी प्रतिस्पर्ध्याचे अभिनंदन करतात, त्याला शुभेच्छा देतात आणि त्याचा सामना पाहतात. खेळाडू आणि सामान्य माणूस यांच्यात फरक आहेत. लहानपणापासून त्यांनी क्रीडा संस्कृती अंगीकारली तर ते चांगले नागरिक होऊ शकतात यात शंकाच नाही असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. आर.पी. सिंह यांनी केले.

विद्यार्थ्यांनी केले राज्यस्तरावर नेतृत्व
अभियांत्रिकी शिक्षणासोबतच क्रिडा कौशल्य प्रत्येक विद्यार्थ्याजवळ असायलाच पाहिजे. विविध क्रिडा प्रकारामध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी नेहमीच आपले कौशल्य सिद्ध करीत असतात याचे उत्तम उदहारण म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड टेलीकम्यूनिकेशन इंजीनियरिंग विभागाच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी अंकिता पाटील हिने संत गाडगेबाबा महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रिय स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला आहे. तसेच क्रिकेट, बास्केटबॉल, बुद्धीबळ अशा स्पर्धांमध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी राज्यस्तरावर नेतृत्व करुन आले असल्याचे इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड टेलीकम्यूनिकेशन इंजीनियरिंग विभागाचे प्रा. अनंत भिडे यांनी सांगितले.

मिनी ऑलंपिकचे दृष्य
क्रीडा महोत्सवात क्रिकेट, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, बॅडमिंटन, टेबल टेनिस, चेस, कॅरम या क्रीडा स्पर्धांनासुद्धा सुरुवात झाली. दुपारच्या सत्रात तर एक मिनी ऑलंपिकचे दृष्य समोर येवून ठेपले होते. वार्षिक स्नेह संमेलनाअंतर्गत जीन्स व कैप डे, सिग्नेचर डेचे सुद्धा आयोजन करण्यात आलेले होते. जीन्स व कैप डे चे परीक्षक म्हणून प्रा. एस. व्ही. राजपूत, प्रा. ए.पी. इंगळे, प्रा. एल.बी. अग्रवाल यांनी जबाबदारी पार पाडली. तसेच सिग्नेचर डे चे परीक्षक म्हणून प्रा. पी.एस. बजाज, प्रा. एस.के. चौधरी, प्रा. एस.एम. हरिमकर यांनी जबाबदारी पार पाडली.

सकाळ सत्रात रंगला सामना
संत गाडगेबाबा अभियांत्रिकीत वार्षिक क्रीडा महोत्सवास रविवार 26 पासून सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड टेलीकम्यूनिकेशन इंजीनियरिंग विभागाच्या विरुध्द मॅकेनिकल इंजीनियरिंग विभागाचा सामना रंगला. प्रा. सुधाकर चौधरी, प्रा. अविनाश पाटील, प्रा. अनंत भिडे, प्रा. योगेश जोशी यांच्या उपस्थितीत क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन झाले.

सुप्त गुणांना चालना
अंतरंगसारखे कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना बहरण्याचे एक व्यासपीठ तयार करून देतात. विद्यार्थ्यांच्या सर्वंगीण विकासासाठी महाविद्यालयातर्फे सुद्धा योग्य प्रयत्न केले जातात सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या संपूर्ण भारत देशाची संस्कृती दर्शवतात याचा फार आनंद होतो. या क्रिडा प्रकारामध्ये सहभाग घेवुन विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांची एक रंगीत तालिमच करतात असे मत अंतरंग प्रमुख प्रा.अजित चौधरी यांनी याप्रसंगी व्यक्त केले.